हाय स्ट्रीट आता ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’
कॅम्प येथे फलक बसविण्यात आल्याने शिवप्रेमींमधून समाधान : सुधीर तुपेकर यांच्या प्रयत्नांना यश
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या कॅम्प येथील हाय स्ट्रीटला अखेर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नाव देण्यात आले आहे. गुरुवारी या ठिकाणी फलक बसविल्याने शिवप्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कॅन्टोन्मेंटचे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी मागील तीन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. भारत स्वातंत्र्य होऊन 79 वर्षे झाली तरी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे रस्ते, तसेच विभागांना तशीच होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डातील एकूण 34 ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सुधीर तुपेकर यांनी मांडला होता.
या संदर्भात त्यांनी संरक्षण मंत्रालयाशी पत्र व्यवहार केला होता. वर्षभरापूर्वी कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत याबाबत नाव बदलायला मंजुरी देण्यात आली. परंतु अद्याप फलक बसविण्यात आले नव्हते. कॅम्पमधील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या हाय स्ट्रीट रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नाव देण्यासाठी सुधीर तुपेकर आग्रही होते. परंतु काहींनी त्याला विरोध केल्याने नामांतर रखडले होते. अखेर बोर्ड मीटिंगमध्ये मंजुरी मिळाल्याने मार्ग सुकर झाला. गुरुवारी हाय स्ट्रीट येथे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे फलक बसविण्यात आले. या फलकांचे अधिकृत उद्घाटन लवकरच होण्याची शक्यता आहे.
उद्यानांना कर्नाटकातील गायकांची नावे...
कॅन्टोन्मेंट बोर्डने अनेक रस्त्यांना हुतात्मा जवान, तसेच उद्यानांना कर्नाटकातील गायकांची नावे दिली आहेत. नॉर्थ टेलिग्राफ रोडला बेळवडी मल्लम्मा, स्मार्ट रोडला शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी, पिकेट रोडला लान्स नायक हनुमंतप्पा, कॅम्प येथील उद्यानाला गंगुबाई हनगल व पंडित भीमसेन जोशी अशी नावे देण्यात आली आहेत.