For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेनमध्ये हायस्पीड रेल्वेंची धडक; 39 ठार

06:51 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेनमध्ये हायस्पीड रेल्वेंची धडक  39 ठार
Advertisement

130 गाड्या रद्द : मदत व बचावकार्याला वेग : अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ अदामुझ

दक्षिण स्पेनमध्ये रविवारी रात्री एक मोठा रेल्वे अपघात झाला. अदामुझजवळ दोन हाय-स्पीड रेल्वेगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत 39 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 122 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींची संख्या मोठी असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती देण्यात आली. रुळावरून घसरलेली एक ट्रेन विरुद्ध दिशेवरील रुळावर गेल्यानंतर समोरून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला धडकल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली.

Advertisement

स्पेनची रेल्वे संघटना ‘एडीआयएफ’ने आपल्या ‘एक्स’ हँडलवर अपघाताची माहिती दिली आहे. मलागा आणि माद्रिद दरम्यानची संध्याकाळची ट्रेन रुळावरून घसरली. माद्रिदहून ह्युएल्वाकडे (स्पेनचे दुसरे दक्षिणी शहर) जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला धडकल्याचे सांगण्यात आले. स्थानिक वेळेनुसार 19:45 वाजता हा भीषण अपघात झाला. कॉर्डोबा शहराजवळ सरळ मार्गावर हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की दुसऱ्या ट्रेनचे बरेच डबे रुळाबाहेर फेकले गेले.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनीही या अपघातानंतर पीडितांप्रती शोक व्यक्त केला आहे. याशिवाय फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनीही या दुर्घटनेवर दु:ख़ाश्रू गाळले. या दुर्घटनेनंतर माद्रिद ते अंदालुसिया दरम्यानच्या सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मदत व बचावकार्याने वेग घेतला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्नही प्रगतीपथावर सुरू आहेत.

या घटनेनंतर माद्रिद आणि अंदालुसिया दरम्यानची हायस्पीड सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, माद्रिद, टोलेडो, सियुडाड रिअल आणि पुएर्तोलानो दरम्यान व्यावसायिक सेवा सामान्यपणे कार्यरत आहेत. या अपघातामुळे तब्बल 130 गाड्या रद्द कराव्या लागल्या. सर्व रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे आता आपत्कालीन सेवांच्या मदतीने मदत व बचावकार्य राबविले जात आहे. अपघातग्रस्त गाड्यांपैकी एक ट्रेन ‘फ्रेसिया 1000’ मॉडेलची होती, जी 400 किमी प्रतितासाच्या वेगाने पोहोचू शकते. अधिकृत तपास अहवाल येण्यासाठी किमान एक महिना लागू शकतो.

प्रवाशांना ‘भूकंप’सदृश अनुभव

अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये असलेले पत्रकार साल्वाडोर जिमेनेझ यांनी या अनुभवाचे वर्णन ‘भूकंप’ असे केले. टक्कर झाली तेव्हा असे वाटले की पृथ्वी हादरत आहे आणि त्यानंतर ट्रेन रुळावरून घसरली. अपघातानंतर रेल्वेचे डबे विखुरल्यानंतर प्रवासी मदतीसाठी ओरडत होते, असेही एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. स्पेनचे वाहतूक मंत्री ऑस्कर पुएन्टे यांनी या अपघाताचे वर्णन ‘अत्यंत विदारक’ असे केले आहे. सरळ मार्गावर घडलेल्या या अपघातामुळे रेल्वे तज्ञांसाठीही हे एक कोडेच असल्याचा दावाही त्यांनी केला.

Advertisement
Tags :

.