For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेडणेत उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा निर्माण करणार

10:09 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पेडणेत उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा निर्माण करणार
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही, तुये येथील गोमेकॉशी संलग्न हॉस्पिटल व संशोधन केंद्राचे लोकार्पण, मेडिकल व नर्सिंग कॉलेज सुरु करण्याची घोषणा

Advertisement

मोरजी : पेडणे तालुक्यात धारगळ येथे आयुष हॉस्पिटल, तुये येथे गोमेकॉशी संलग्न हॉस्पिटल व संशोधन केंद्राबरोबरच तेथे काही वर्षात मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज सुरु करून पेडणे तालुक्यासाठी उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा सरकारकडून निर्माण केल्या जातील. येथे काही ओपीडी आजपासून सुरु झाल्या असून सहा महिन्यात आयसीयू, ऑपरेशन थिएटर आदी विभाग सुरु करुन पूर्ण क्षमतेने हॉस्पिटल कार्यरत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

तुये येथील बहुचर्चित गोमेकॉशी संलग्न हॉस्पिटलचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, गोमेकॉचे डीन डॉ. तिवारी, डॉ. राजेश पाटील, धारगळ जिल्हा पंचायतसदस्य श्रीकृष्ण हरमलकर, तुयेच्या सरपंच सुनीता साळगावकर, गोमेकॉचे सुप्रिटेंडन डॉ. रोहित कदम, तुये हॉस्पिटलचे डॉ. पाटील, आरोग्य खात्याच्या संचालक व्यासपीठावर उपस्थित होत्या.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, जे डॉक्टर येथे उपलब्ध आहेत त्यांना नियुक्त केलेले आहे. तसेच यापुढेही लागणारे डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या कारकिर्दीत गोव्याने आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारक कामगिरी बजावली आहे. आपले सरकार आरोग्यविषयी संवेदनशील असून या क्षेत्रात नवनवीन बदल घडवून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण भागात आरोग्यसुविधा देण्यात यश : विश्वजित राणे

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, आपल्या आरोग्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत गोव्याच्या आरोग्यसेवेला प्राधान्य दिले आहे. गोमेकॉमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध करुन देत असताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकांना आरोग्यविषयक सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना काही अंशी यश आल्याचे त्यांनी सांगितले. तुये हॉस्पिटलमध्ये जीएमसीप्रमाणेच सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तर गोव्यासाठी वरदान ठरणार : जीत आरोलकर

आमदार जीत आरोलकर यांनी, सातत्याने या हॉस्पिटलचा पाठपुरावा केल्यामुळे तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या दूरदृष्टीतून हे हॉस्पिटल साकारले असल्याचे सांगितले. या हॉस्पिटलमध्ये जीएमसीप्रमाणेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याने उत्तर गोव्यासाठी हे हॉस्पिटल वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पेडणेतील लोकांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण : प्रवीण आर्लेकर

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, पेडणे तालुक्यातील लोकांचे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. या हॉस्पिटलसाठी आंदोलन करणाऱ्यांचे आपण ऋण व्यक्त करतो. त्यांच्यामुळे सरकारला जाग आली. पेडणे तालुक्याची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने प्राधान्य क्रमाने तुये हॉस्पिटल सुरु केले आहे. वाढती लोकसंख्या पाहिल्यानंतर हॉस्पिटल गरजेचे होते, असे ते म्हणाले. डॉक्टर मानसी आळवे, चतुरा गोवेकर, सोनिया नाईक यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. रोहीत कदम यांनी आभार मानले.

डॉक्टरांनी सेवा देण्यासाठी पुढे यावे, योग्य मोबदला देऊ

इतर राज्यात किंवा परदेशात डॉक्टरी सेवा बजावणाऱ्या युवकांनी गोव्यात यावे. या हॉस्पिटलमध्ये सेवा द्यावी. त्यासाठी योग्य तो मोबदला देण्याची सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तुये हॉस्पिटलमध्ये संशोधन केंद्रही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येईल. मेडिकल आणि नर्सिंग कॉलेज सुरु झाल्यानंतर त्याचा लाभ इथल्या विद्यार्थ्यांना होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.