सीमाप्रश्नी ३० रोजी उच्चाधिकार समितीची बैठक
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठपुराव्याला यश : मुंबई येथील धरणे आंदोलन स्थगित
सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या खटल्याला गती मिळावी यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून वेळोवेळी केली जात होती. अखेर महाराष्ट्र सरकारने ही मागणी मान्य करीत मंगळवार दि. 30 रोजी मुंबई येथील विधानभवनात उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित केली आहे. म. ए. समितीच्या पाठपुराव्याला यश आले असल्याने मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होणारे धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीची तातडीची बैठक शुक्रवारी मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. प्रारंभी सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी महाराष्ट्र सरकारकडून मध्यवर्ती म. ए. समितीला आलेल्या पत्राचे वाचन केले. मंगळवारी दुपारी 1 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सत्ताधारी, विरोधी गटातील नेते, तसेच अधिकारी असे एकूण 18 जण व तज्ञ समिती, तसेच मध्यवर्ती म. ए. समितीचे तीन सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सीमाप्रश्नाचा खटला अनेक दिवसांपासून रखडला असल्याने तो पटलावर यावा, यासाठी उच्चाधिकार समितीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु उच्चाधिकार समितीची बैठक बोलाविण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असल्याने मागील वर्षभरापासून उच्चाधिकार व तज्ञ समितीची बैठक बोलाविण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मध्यवर्ती म. ए. समितीकडून महाराष्ट्रातील सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र पाठविण्यात आले होते. याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून उच्चाधिकार समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
बऱ्याच दिवसांनी उच्चाधिकार व तज्ञ समितीची एकत्रित बैठक होणार असल्याने सीमावासियांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर व कार्याध्यक्ष मनोहर किणेकर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून ही बैठक बोलाविण्यात आली असून यावेळी म. ए. समिती महत्त्वाचे मुद्दे मांडणार असल्याचे सांगण्यात आले. उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठीच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आता बैठकच बोलाविण्यात आली असल्याने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
यावेळी अॅड. एम. जी. पाटील, रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, नारायण सावगांवकर, मनोहर हुंद्रे, गोपाळ पाटील, मोनाप्पा पाटील, आर. के. पाटील, रामकृष्ण गावकर, रावजी पाटील, रामचंद्र मोदगेकर, गोपाळ देसाई, लक्ष्मण होनगेकर, राजाराम देसाई, अनिल पाटील, बाळासाहेब फगरे, पियुष हावळ, लक्ष्मण पाटील, राजू मरवे उपस्थित होते.
मराठी नाटकांचा प्रश्न महाराष्ट्र सरकारसमोर मांडणार
महाराष्ट्रातून बेळगावमध्ये येणाऱ्या नाटकांना कर्नाटक सरकारकडून भरमसाट कर लादण्यात आला आहे. करमणूक कराच्या नावाखाली नाटक कंपन्यांकडून 70 ते 80 हजार रुपये वसूल केले जात असल्याने मराठी नाटक बेळगावला येत नाहीत. यातून तोडगा काढण्यासाठी मराठी नाटकांचा प्रश्न महाराष्ट्र सरकारसमोर मांडणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.