For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी

08:09 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी
Advertisement

समिती स्थापन मृतांच्या कुटुंबीयांसाठी 10 लाख, तर जखमींना 1 लाख आर्थिक मदत जाहीर

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

शनिवारी पहाटे शिरगांव येथील श्री लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. शिरगाव येथे घडलेली पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समिती स्थापन करण्यात आली आहे. शिरगाव येथील घटनेत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकजण जखमी झाले आहेत. ही समिती आज आपला अहवाल सादर करणार आहे,  असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच इस्पितळात जाऊन जखमींची विचारपूस केली. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख ऊपये तर जखमी झालेल्यांना 1 लाख ऊपये आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. जखमींवर योग्य उपचार होतील याची काळजी घेतली जाईल. अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी देखील घटनास्थळी उपस्थित राहून एकंदरीत प्रकरणाचा आढावा घेतला. लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरीची घटना घडली, त्यावेळी सुमारे 1 लाख भाविक तेथे उपस्थित होते. ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ जखमींना उपचारांसाठी इस्पितळांमध्ये नेण्यावर भर दिला, असे ते म्हणाले.

समिती जाहीर

शिरगाव येथे घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यात पोलिस महानिरीक्षक वर्षा शर्मा, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इग्ना क्लिटस व दक्षिण गोवा अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांचा समावेश आहे.

राज्यात तीन दिवस दुखवटा

शिरगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मृतांना आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी गोवा सरकारने पुढील तीन दिवसांत होणारे सर्व सरकारी सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

जिल्हा प्रशासन हेल्पलाईन

शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. या दुर्घटनेमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी केले आहे. पीडितांनी उपजिल्हाधिकारी (डिचोली) यांच्याशी  8806562152 आणि उत्तर गोवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी  0832-2225383 या क्रमाकांवर संपर्क साधावा. प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचेही गीते यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.