For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संसद सुरक्षा त्रुटीची उच्चस्तरीय चौकशी

06:55 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
संसद सुरक्षा त्रुटीची उच्चस्तरीय चौकशी
Advertisement

लोकसभा अध्यक्षांचे सर्व खासदारांना पत्र : ‘राजकारण’ न करण्याचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल विरोधकांच्या हल्ल्यांदरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना पत्र लिहिले आहे. संसदेत घडलेल्या घटनेवर खासदारांनी राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे. सभागृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याचेही लोकसभा अध्यक्षांनी सांगितले. तसेच गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त करत सभागृह सुरळीत चालण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी खासदारांना सांगितले.

Advertisement

लोकसभेतील सुरक्षा भंगाचे प्रकरण गेल्या चार दिवसांपासून चर्चेत आहे. या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्याने कामकाजही विस्कळीत झाले. विरोधी पक्षांनी संसदेत गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे उत्तरे मागितली आहेत. याचदरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना पत्र लिहिले आहे. त्यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय पत्राद्वारे कळवला आहे.

खासदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात लोकसभा अध्यक्षांनी अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला आहे. ‘खासदारांच्या निलंबनाची घटना या घटनेशी जोडली जाणे दुर्दैवी आहे. याआधीही अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या असून देश त्याचा साक्षीदार आहे, असे बिर्ला यांनी म्हटले आहे. सभागृहातील कोणत्याही गंभीर घटनांवर कोणता निर्णय घ्यायचा हा लोकसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी मला खासदारांना निलंबित करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘प्रत्येकासाठी चिंतेचा विषय’

13 डिसेंबर रोजी सभागृहात घडलेली दुर्दैवी घटना आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. या घटनेबद्दल आम्ही सभागृहात सामूहिक चिंता व्यक्त केली. त्याच दिवशी सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत मी सभागृहात चर्चा केली. संसदेतील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत कशी करता येईल? यादृष्टीने बैठकीत दिलेल्या काही महत्त्वाच्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे लोकसभा अध्यक्षांनी पत्रात म्हटले आहे.

पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणार

सभागृहात घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने काम सुरू केले असून या समितीचा अहवाल लवकरच सभागृहात मांडला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उच्चस्तरीय समिती संपूर्ण संसद संकुलाच्या सुरक्षेशी संबंधित विविध पैलूंचा आढावा घेईल. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी समिती अशा ठोस उपाययोजना व आराखडा तयार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Advertisement
Tags :

.