For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महामार्ग प्राधिकरणाला उच्च न्यायालयाची नोटीस

10:57 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
महामार्ग प्राधिकरणाला उच्च न्यायालयाची नोटीस
Advertisement

न्यायालयात महामार्ग प्राधिकरणाचे वकील गैरहजर : दडपशाही करत हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरूच : शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी

Advertisement

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तातडीची नोटीस बजावली आहे. न्यायालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वकीलच गैरहजर राहत आहेत. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली असून काहीही झाले तरी आता हा रस्ता होणे अशक्य असल्याचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढलेल्या नोटीसमध्ये झिरो पॉईंटचा उल्लेख आहे. झिरो पॉईंट हा बेळगाव-खानापूर रोडवरील कॅम्प येथे येतो. त्यामुळे झिरो पॉईंटचा गुंता सुटल्याशिवाय रस्त्याचे काम करणे तसे अशक्यच आहे. बेकायदेशीररित्या पोलीस संरक्षणात या रस्त्याचे काम सुरू आहे. घाईगडबडीत हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जाणूनबुजून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वकील गैरहजर राहत आहेत. त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सुनावणी 4 एप्रिल रोजी होणार आहे.

उभ्या पिकांतून हा रस्ता केला जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. एकप्रकारे न्यायालयाचा अवमान आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा रस्ता पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचबरोबर न्यायालयाचाही अवमान झाला आहे. त्यामुळे भविष्यात बेकायदेशीररित्या रस्ता करणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार, हे निश्चित आहे, असे अॅड. रवीकुमार गोकाककर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अलारवाड येथून हलगा-मच्छे बायपासचे काम सुरू करण्यात आले आहे. न्यायालयामध्ये खटला दाखल असताना, तसेच स्थगिती असतानाही हे काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र पोलीस संरक्षणात हे काम सुरू आहे. झिरो पॉईंटचा गुंता सुटल्याशिवाय रस्ता करणे तसे अशक्य आहे. असे असताना हा रस्ता केला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी नुकसानभरपाईही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला द्यावी लागणार आहे. याचबरोबर थोड्याच दिवसांत या रस्त्याचे काम थांबवावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

मंगळवारीही रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरूच

हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम मंगळवारी पोलीस संरक्षणात युद्धपातळीवर सुरूच होते. खडी टाकून पसरण्याचे काम सुरू होते. याचबरोबर रस्त्याचे सपाटीकरणही काही ठिकाणी केले जात आहे. कामाला गती देण्यात आली असल्याने लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. न्यायालयात स्थगिती असताना हे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.