बालिका अपहरणप्रकरणी देवगड पोलिसांना हायकोर्टाची नोटीस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिली 'हेबियस कॉर्पस' याचिका : कोल्हापूर खंडपीठांसमोर 19 रोजी सुनावणी
प्रतिनिधी देवगड
तालुक्यातील दहिबाव - तांबळवाडी येथून अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षीय बालिकेचा 18 दिवस उलटूनही कोणताही शोध न लागल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने देवगड पोलिसांना नोटीस बजावून अहवाल मागविला आहे. या अपहरण प्रकरणातील गुन्ह्यात न्याय मिळण्यासाठी अपहृत बालिकेच्या आईने देवगड येथील विधीज्ञ ॲड. कौस्तुभ मराठे यांच्यामार्फत कोल्हापूर खंडपीठांसमोर अत्यंत दुर्मिळ अशी हेबियस कॉर्पस प्रकारातील याचिका दाखल केली होती. या याचिकेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री अवचट. व न्यायमूर्ती श्री कडेठानकर या द्विसदस्यीय पीठाने पहिल्याच दिवशी दुपारी प्राथमिक सुनावणी घेत देवगड पोलिसांना ही नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजी कोल्हापूर सर्किट बेंच समोर होणार आहे. दहिबाव तांबळवाडी येथे विभक्त राहणाऱ्या पीडित विवाहित महिलेच्या घरात घुसून तिच्या अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे जन्मदात्या पित्याने व एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना 23 डिसेंबर 2025 रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी पीडित मातेने देवगड पोलीस स्थानकात घटनेची फिर्याद दाखल केली होती. त्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पीडित माता वारंवार देवगड पोलीस स्थानकात जाऊन आपले बाळ परत मिळेल का याची चौकशी करून रिकाम्या हाती मागे परतत होती. गुन्हा दाखल होऊन 18 दिवस उलटले तरी अपहृत बालिकेचा कोणताही शोध न लागल्याने हताश झालेल्या पीडित मातेने देवगड येथील विधीज्ञ ॲड. कौस्तुभ मराठे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठांसमोर दुर्मिळ अशी हेबियस कॉर्पस प्रकारातील याचिका दाखल केली. हेबियस कॉर्पस प्रकारातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दाखल झालेली ही पहिली याचिका आहे. यामध्ये डांबून ठेवलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष शारीरिक स्वरूपात न्यायालयात हजर करण्याचा आदेश केला जातो. दोन वर्षीय बाळाचे अपहरण झालेले असताना मागील 18 दिवसात पोलीस तपासात काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे अपहृत बालिकेच्या मातेने केलेल्या याचिकेचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायमूर्ती श्री अवचट आणि न्यायमूर्ती श्री कडेठानकर यांच्या द्विसदस्यीय पीठाने त्याच दिवशी प्राथमिक सुनावणी केली. यावेळी याचिकाकर्त्या मातेच्या बाजूने ॲड. मराठे आणि खंडपीठांसमोर युक्तिवाद केला. त्यावर खंडपीठाने तात्काळ देवगड पोलिसांना नोटीस बजावत सदर गुन्ह्यातील तपासाचा अहवाल मागविला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 19 जानेवारी रोजी कोल्हापूर सर्किट बेंचसमोर होणार आहे. दरम्यान या अपहरण प्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या एका संशयित व्यक्तीचे वास्तव्य तालुक्यातील एका गावामध्ये असतानाही त्याच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे पीडित मातेचे म्हणणे आहे.