For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अखेर हिरवा कंदील! पाचवी, आठवी, नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परिक्षा

07:15 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेर हिरवा कंदील  पाचवी  आठवी  नववी  अकरावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परिक्षा

पाचवी, आठवी, नववी, अकरावी बोर्ड परीक्षा होणारच : संभ्रम दूर

Advertisement

बेंगळूर : पाचवी, आठवी, नववी आणि अकरावी इयत्तांच्या राज्यस्तरीय बोर्ड परीक्षेला  उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हिरवा कंदील दाखविला आहे. राज्याचा अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या शाळांमधील पाचवी, आठवी, नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे परीक्षेविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. राज्य सरकारने राज्याचा अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या शाळांमधील पाचवी, आठवी, नववी आणि अकरावीसाठी शालेय पातळीवरील मूल्यमापनाऐवजी राज्यस्तरावर बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. याकरिता ऑक्टोबर 2023 मध्ये दोन स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या होत्या. या आदेशाविरोधात विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटनेने (रुप्सा) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रवी होसमनी यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारचा आदेश रद्द केला होता. 11 मार्चपासून होणाऱ्या बोर्ड परीक्षा अचानक रद्द झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटनेने गुरुवारी उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे धाव घेऊन एक सदस्यीय खंडपीठाचा आदेश रद्द करावा, तसेच त्यावर तातडीने सुनावणी करावी, अशी विनंती केली होती. मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्या. टी. जे. शिवशंकरेगौडा यांच्या खंडपीठाने सदर याचिकेवर सुनावणी केली. सरकारच्यावतीने अतिरिक्त अॅड. जनरल विक्रम हुईलगोळ यांनी युक्तिवाद करताना 11 मार्चपासून पब्लिक परीक्षा घेण्यासाठी शिक्षण खात्याने सर्व प्रकारची तयारी केली आहे. 53,680 सरकारी, अनुदानित शाळांमध्ये परीक्षा होत आहेत. मात्र, विनाअनुदानित शाळांनीच बोर्ड परीक्षेला आक्षेप घेतला आहे. स्वहितासाठी त्यांनी रिट याचिका दाखल केली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी या परीक्षेला आक्षेप घेतलेला नाही, असे म्हटले आहे.

नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार परीक्षा

Advertisement

उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने बोर्डाच्या परीक्षेवरील स्थगिती उठविल्यानंतर राज्य सरकारने गुरुवारी सायंकाळीच आदेशपत्रक जारी केले आहे. त्यात नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सोमवार दि. 11 मार्चपासून पाचवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार 11 ते 14 मार्च या कालावधीत पाचवीची तर 11 ते 18 मार्च या कालावधीत आठवी आणि नववीसाठी बोर्डाची परीक्षा होणार आहे. द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित (संकलनात्मक मूल्यमापन- 2) ही परीक्षा होईल.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.