प्रदेशाध्यक्ष निवडीचा निर्णय हायकमांड करेल
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेळगाव : कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष निवडीचा निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पक्षाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांच्याशी राज्याचा विकास व विकासासाठी प्रत्येक आमदाराला निश्चित करण्यात आलेला निधी याविषयी चर्चा झाली आहे. नूतन प्रदेशाध्यक्ष निवड करण्यासंबंधी कसलीच चर्चा झाली नाही. यासंबंधी हायकमांड निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या क्रिकेट संघाच्या विजयोत्सवावेळी घडलेल्या चेंगराचेंगरीविषयी चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाचा अभ्यास करून सरकार निर्णय घेणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आरसीबीने कसलीच परवानगी घेतली नाही, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.