For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमधील आपत्तीनंतर बिहारमध्ये अलर्ट कायम

06:36 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमधील आपत्तीनंतर बिहारमध्ये अलर्ट कायम
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, पाटणा

Advertisement

नेपाळमधील विनाशकारी पूरस्थितीने भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांना धोका निर्माण होऊ शकतो. बिहारमधील संभाव्य भीतीमुळे काही भागात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नेपाळमधून येणारे पाणी आणि स्थानिक पातळीवर होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण कायम आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने काही भागातून लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचनाही जारी केल्या आहेत.

हवामान विभागाने शुक्रवारपासून बिहारमधील पर्जन्यविषयक परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यभरात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. काही जिह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि इतर जिह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. खराब हवामानात लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या जिह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Advertisement

शेजारील देशातील पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेपाळमधील अचानक आलेल्या पुरानंतर संवेदनशील भागांमधील पाणी पातळी आणि पुराच्या परिणामांचा आढावा घेण्यात आल्याचे बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांनी वाल्मिकी नगरपर्यंतच्या परिस्थितीची स्वत: पाहणी केली. आम्ही संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ईश्वरी कृपेने, जवळपास सर्व काही पूर्ववत होत आहे. आम्हाला सध्या पाण्याच्या पातळीबाबत कोणतीही मोठी समस्या दिसत नाही. राज्यातील परिस्थिती हळूहळू स्थिर होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी गंडक नदी आणि सीमावर्ती पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली.

नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोनपूर ते वाल्मिकीनगर दरम्यानच्या गंडक नदीची हवाई पाहणी केली. वाल्मिकीनगर बॅरेजच्या वरच्या आणि खालच्या भागाची पाहणी करण्यात आली. पाहणीच्या वेळी, पाण्याचा विसर्ग अंदाजे 1.06 लाख क्युसेक होता. त्यांनी बागाहा, वाल्मिकीनगर, बेतिया आणि मोतिहारी यांसह सीमावर्ती भागांतील पूर परिस्थिती आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अत्यंत दक्षतेने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक खबरदारीचे उपाय योजण्याचे निर्देश दिले.

एनडीआरएफची 9 पथके तैनात

नेपाळमधील दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील संवेदनशील भागांमध्ये नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत, असे एनडीआरएफचे आयजी नरेंद्र सिंह बुंदेला यांनी सांगितले. गरज भासल्यास मदत पुरवण्यासाठी एनडीआरएफ सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. धोका निश्चितपणे टळला आहे, परंतु तो पूर्णपणे टळलेला नाही, असे त्यांनी सांगितले. प्रशासन आणि संपूर्ण पथक पूर्णपणे सतर्क आहे. दरम्यान, मुंगेरमध्ये गंगा नदीला पूर आला असून, अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. कुटलुपूरमध्ये धूप प्रतिबंधक कामाला सुरुवात झाली आहे.

Advertisement
Tags :

.