तीव्र आंदोलनांमुळे फ्रान्समध्ये हाय अलर्ट
70 हजार पोलीस कर्मचारी तैनात : पॅरिसमध्ये मोर्चावर बंदी
वृत्तसंस्था/ पॅरिस
वाढती महागाई आणि शैक्षणिक संस्थांच्या निधीपुरवठ्यावरून फ्रान्समध्ये आंदोलने तीव्र झाली आहेत. सलग तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या निदर्शनांच्या शक्यतेने सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. फ्रान्समध्ये आंदोलनांदरम्यान होणाऱ्या हिंसाचार आणि अशांततेच्या शक्यतेने सुमारे 70 हजार पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. राजधानी पॅरिससह अन्यत्र सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
वाढत्या महागाईविरोधात फ्रान्सभर मोठ्या संख्येने लोक निदर्शने करत आहेत. फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या म्हणून सुरू झालेली ही चळवळ आता देशभरात पसरली आहे. राजधानी पॅरिससह फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी पॅरिसमधील मोर्चाचा मार्ग शहराच्या बाहेरील भागात वळवण्यात आला आहे. पोलिसांनी कामगार संघटना आणि ‘यलो वेस्ट’ आंदोलकांच्या मोर्चाला शहराच्या मध्यभागातून जाण्यास बंदी घातली आहे. आंदोलकांना आता फक्त पोर्ट डी बॅग्नोलेट ते पोर्ट डी शॅरेंटन या निश्चित मार्गावरूनच मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांनी पॅरिसमधील प्लेस दे ला रिपब्लिक आणि लेस हालेस येथे प्रवेशावरही निर्बंध घातले आहेत. या दोन्ही भागांमध्ये 17 ऑक्टोबर रोजी दंगल आणि लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी निदर्शनांवर लादलेल्या निर्बंधांना न्यायालयात आव्हान दिले, परंतु त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
जर्मनी, स्पेनमध्येही आंदोलने
फ्रान्स व्यतिरिक्त जर्मनी आणि स्पेनमध्येही तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांचे नियोजन केले जात आहे. जर्मनीमध्ये, ‘जेन झेड रेगाल्ट’ नावाच्या एका युवा गटाने सुमारे 30 शहरांमध्ये निदर्शनांचे आवाहन केले आहे. शिक्षण, आरोग्य, हवामान संरक्षण आणि परवडणाऱ्या राहणीमानासाठी मागण्या करणे हा या निदर्शनांचा उद्देश आहे. बर्लिनमधील ब्रँडनबर्ग गेटवर सुमारे 10,000 लोक जमण्याची शक्यता आहे. स्पेनमधील बार्सिलोनामध्येही सुरक्षा व्यवस्था वाढवली जात आहे. गेल्या आठवड्यातील दंगलींनंतर अंदाजे 130 जणांना अटक करण्यात आली. युरोपभर होणाऱ्या संभाव्य आंदोलनांच्या शक्यतेमुळे सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
