देशातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट
संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत इशारा जारी : कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवरात्रोत्सव किंवा सणासुदीमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना भारतात पुन्हा एकदा मोठा घातपात घडवण्याचा विचार करत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून जारी करण्यात आली आहे. यावेळी पाकिस्तानचे लक्ष्य देशातील विमानतळ आहेत. गुप्तचर संस्थांनी यासंबंधी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) यासंदर्भात इशारा दिला आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, देशातील सर्व विमानतळांची सुरक्षा कडक करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
देशातील विमानतळांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ‘बीसीएएस’च्या इशाऱ्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या काळात दहशतवादी हल्ले होण्याची भीती या इशाऱ्यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानतळांवर हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षेत ही वाढ करण्यात आली आहे. काही ‘समाजविरोधी घटक’ अशांतता निर्माण करण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या इशाऱ्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार, सर्व विमानतळ, हवाई क्षेत्र, हेलिपॅड आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये देखरेख वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय सुरक्षा एजन्सीकडून सावधानता बाळगण्याचा इशारा मिळाल्याचे ‘बीसीएएस’ने म्हटले आहे. समाजविरोधी घटक किंवा दहशतवादी गटांकडून संभाव्य धोका असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा वाढवली जात आहे. विमानतळांवर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना 24 तास हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. ते विमानतळ टर्मिनल, पार्किंग क्षेत्र आणि आजूबाजूच्या सर्व भागात सतत गस्त घालतील. यासोबतच, स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने विमानतळांना शहराची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय उ•ाणांवरही कडक देखरेख
ही सूचना केवळ देशांतर्गत उ•ाणांनाच नाही तर आंतरराष्ट्रीय उ•ाणांनाही लागू होते. सर्व विमान कंपन्यांना विमानात लोड करण्यापूर्वी सर्व मालाची कसून तपासणी करावी लागेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शिपमेंटसाठी येणाऱ्या मेल पार्सलची तपासणी देखील कडक करण्यात आली आहे. ‘बीसीएएस’ने स्थानिक पोलीस, सीआयएसएफ, गुप्तचर विभाग आणि इतर गुप्तचर संस्थांसारख्या सर्व संबंधित एजन्सींशी जवळून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यामागे कोणत्याही धोक्याशी संबंधित माहिती त्वरित शेअर करणे आणि वेळेवर कारवाई करण्याचा उद्देश आहे.
विमानतळ प्राधिकरण अॅक्शन मोडमध्ये
विमानतळावर येणाऱ्या सर्व कर्मचारी, कंत्राटदार आणि अभ्यागतांची ओळख तपासली जाईल याची खात्री विमानतळ प्राधिकरणाला करावी लागेल. जर एखाद्या व्यक्तीने परवानगीशिवाय विमानतळात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ताबडतोब थांबवले जाईल. संबंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दल माहिती दिली जाईल. याशिवाय, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवून सतत निरीक्षण केले जात असल्याची खात्रीही केली जाईल. कोणतेही संशयास्पद वस्तू किंवा वर्तन दिसल्यास त्वरित कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनाही सतर्कतेच्या सूचना
प्रवाशांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा कोणतीही बेनामी वस्तू आढळल्यास त्वरित अधिकाऱ्यांना कळवावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. गरज पडल्यास विमानतळांवर वेळोवेळी दक्षतेच्या घोषणा देखील केल्या जातील. या सूचनांमधून प्रवाशांना सुरक्षेशी संबंधित माहिती दिली जाईल. आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि प्रोटोकॉलचा आढावा घ्यावा असेही सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. शक्य असेल तिथे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुनिश्चित करण्यासाठी जलद सराव किंवा ब्रीफिंग आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.