For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘हिडकल’ ओव्हरफ्लो, चिंता मिटली

07:58 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘हिडकल’ ओव्हरफ्लो  चिंता मिटली
Advertisement

जलाशयात 8523 क्युसेक पाण्याची आवक : जलाशयातून जीआरबीसी अन् सीबीसी कालव्यांना 4655 क्युसेक पाणीपुरवठा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

संकेश्वर : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलाशय भरणार का? अशी चिंता असतानाच महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसाने रविवारी हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशय पूर्ण 51 टीएमसी क्षमतेने भरला. यामुळे बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यासह हुक्केरी तालुक्यातील लाभार्थी भागातील पाणी टंचाईची चिंता मिटली आहे.

Advertisement

जलाशयात सध्या 8523 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून जलाशयातून जीआरबीसी व सीबीसी कालव्यांना मिळून 4655 क्युसेक पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या पाण्यामुळे सिंचनासाठी आवश्यक असलेल्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील पिकांना तसेच आगामी रब्बी हंगामासाठीही जलसाठा उपयुक्त ठरणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जलाशयात पाण्याची आवक कायम राहिल्यास अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलाशयातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यास नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे,  नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हिडकल जलाशयाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांना या जलसाठ्याचा थेट फायदा होत असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या काही काळापासून पाण्याच्या उपलब्धतेबाबत असलेली चिंता मिटली असून, पिकांना पुरेसे पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जलाशयातून कालव्यांना सुरू असलेला पाणीपुरवठा आणि जलाशयात सुरू असलेली आवक यामुळे परिसरातील शेतीला मोठा आधार मिळाला आहे. मात्र, अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास नदीकाठच्या नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.   तालुक्यातील हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी व मार्कंडेय या चाहरी नद्या दुथडी भरुन वाहत असल्या तरी तालुक्यातील विहिरी, नाले व लहान जलस्त्राsत अद्यापही तहानलेले असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी मघा नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाली असून नक्षाच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हुक्केरी : रविवारी हिडकल जलाशय 51 टीएमसी क्षमतेने भरला असून जलाशयात घटप्रभा नदीद्वारे पाण्याची आवक होत आहे. जलाशयातून 5 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठ भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी आपली जनावरे, घरातील साहित्य हलवावे. हुक्केरी तालुक्यातील मदमक्कनाळ, बडकुंद्री, होसूर, यरनाळ, बस्तवाड, गौडवाड, बेनीवाड, सुलतानूर, अवरगोळ, शिरगांव, मदीहळी, गुडस, जंगठीहाळ, गोकाक तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन साहाय्यक कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.