न्हावेलीत जंगली प्राण्यांचा हैदोस
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा ; अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करू ; मनसेचा इशारा
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली गावात जंगली प्राण्यांचा हैदोस तसेच उपद्र वाढला आहे.वन्य प्रण्यांमुळे शेती बागायतीचें अतोनात नुकसान झाले असून याबाबत काहीच दखल न घेणाऱ्या वनविभागाच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.न्हावेली गावात गेली काही वर्षे गवारेड्यांनी शेती बागायती ,त्याचप्रमाणे काजू ,आंबा या झाडांचें लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.हे काही थोडे तर दिवसा ढवळ्या गावात बिबट्याचा संचार पहावयास मिळतो.
काही महिन्यांपूर्वी न्हावेली विवरवाडी येथील संतोष हरमलकर यांच्या वाड्यातील वासरू वाघाने मारल्याची घटना ताजी असताना आता राजू परब या शेतकऱ्याच्या वासराची शिकार केल्याचे उघड झाले आहे. वनविभाग आता बिबट्याकडून माणसे मारण्याची वाट बघत आहे का?असा सवाल ग्रामस्थांमधून विचारण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी गावात कामावरून येताना,फिरताना सर्रास लोकांना वाघ दिसण्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी वनविभाग काय कार्यवाही करणार आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थातून होत आहे. व याची दखल न घेतल्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य श्री अक्षय पार्सेकर आणि मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी श्री चेतन पार्सेकर, आणि न्हावेली ग्रामस्थ यांनी दिला आहे.तिरोडा ,नाणोस, गुळदुवे येथील बिबट्याचा संचार वारंवार आढळत असताना अजून देखील हवी तशी कार्यवाही झाली नसल्याचे समजते. मनसेने वनविभागात धडक दिली . मात्र, वन विभागाचे अधिकारी कार्यालयीन कामाचे कारण देऊन गायब झाले.त्यामुळे लवकरच मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली व विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या मार्गदर्शनाने बोंबाबोंब आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.सदर बोंबाबोंब आंदोलनाला मनसे पदाधिकारी आणि न्हावेली गावासहित तिरोडा ,गूळदुवे ,नाणोस या गावातील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. दिवाळी सणानंतर सदर बोंबाबोंब आंदोलन सावंतवाडी वनविभागासमोर छेडण्यात येणार आहे असे श्री पार्सेकर म्हणाले .