साडेतीन कोटीतून हायटेक मेगा डेअरी उभारणार
बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने जिल्ह्यात 1002 दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 610 दूध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत आहेत. तर यापैकी 160 महिला संघटना आहेत. आतापर्यंत 622.10 लाख भाग भांडवल जमा झाले आहे. उत्तर कर्नाटकात बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आघाडीवर असून सन 2025-26 मध्ये अत्याधुनिक मेगा डेअरी सुरू केली जाणार आहे. यासाठी संकेश्वर परिसरात 50 एकर जमिनीची पाहणी केली जात असून साडेतीन कोटी रुपये खर्ची घालून हायटेक मेगा डेअरी उभारली जाणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंगळवारी शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी गेल्या वर्षभरातील आढावा व प्रगती पत्रकारांशी बोलताना सांगितली. यावेळी व्यासपीठावर सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ उपस्थित होते. अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, बेळगावात दीड लाख क्षमतेची मुख्य डेअरी आहे. रामदुर्ग येथे 30 हजार लिटर तर अथणीत 30 हजार लिटर आणि रायबाग येथे 60 हजार क्षमतेचे शीतगृह आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या स्वच्छ दूध (शुद्ध दूध) उत्पादन आणि विशेष पॅकेज योजनेंतर्गत एकूण 39 बीएमसी युनिटची स्थापना केली आहे. प्लेक्सी पॅक युनिटची दररोज 80 हजार लिटर दूध पॅपेंग करण्याची क्षमता आहे.
त्याचबरोबर बेळगाव हे महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने सीमावर्ती भागासह तालुक्यांमध्ये नवीन दूध उत्पादक सहकारी संस्था सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सन 2024-25 मध्ये 43 नवीन दूध संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर देण्यासाठी प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांनीदेखील चांगल्या दर्जाचे दूध पुरविणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी आपल्याकडे कसे मिळतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेळगावातून गोवा, त्याचबरोबर पुणे, मुंबई या ठिकाणी दूध पाठविले जात आहेत. नोव्हेंबर 2024 पासून बेळगावातून मुंबई बाजारपेठेत म्हशीचे दूध पाठविले जात आहे. सध्या दररोज पाच हजार लिटर दूध पाठविले जात आहे. सन 2024-25 मध्ये संघाच्या वार्षिक खर्चात 2.25 कोटी रुपयांची बचत झाली आहे. संघाची एकूण उलाढाल 399.50 कोटी असून मागील वर्षी ही 320.83 कोटी इतकी होती. गतवर्षीच्या तुलनेत 24 टक्के अतिरिक्त प्रगती संघाने साधली आहे. त्यामुळे संघाने इतिहासात सर्वाधिक उलाढाल केली असून विक्रम केला आहे. अत्याधुनिक मेगा डेअरी सुरू करण्यासाठी संकेश्वर भागात जागेची पाहणी केली जात आहे. जागा मिळाल्यास 350 कोटींच्या निधीतून डेअरी उभारली जाणार आहे, असे ते म्हणाले.