हिजबुल्लाहच्या उपनेत्याचे लेबनॉनमधून पलायन
इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये घेतला आश्र्रय
वृत्तसंस्था/ बेरूत
हिजबुल्लाहचे उपनेते आणि संघटनेचे उपमहासचिव नईम कासिम यांनी लेबनॉनमधून पलायन करत इराणमध्ये आश्रय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी ते इराणच्या विमानातून लेबनॉनमधून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. यूएईस्थित एरेम न्यूजने अज्ञात इराणी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
लेबनॉन आणि सीरियाच्या राज्य भेटीसाठी तेहरानचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी वापरलेल्या विमानातून नईम कासिम यांनी 5 ऑक्टोबर रोजी बेरूत सोडले. हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर नईम कासिमने तीन भाषणे दिली आहेत. पहिले भाषण बेरूतमध्ये रेकॉर्ड करण्यात आले होते, तर दुसरे आणि तिसरे भाषण तेहरानमधून देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
71 वर्षीय नईम कासिम यांची हिजबुल्लाहचे ‘नंबर दोन’चे नेते म्हणून ओळखले जाते. त्यांचा शिया राजकारणाशी दीर्घकाळ संबंध आहे. 1970 च्या दशकात ते इमाम मुसा अल-सद्र यांच्या चळवळीत सामील झाले. ही चळवळ पुढे लेबनॉनमधील शिया गटाच्या ‘अमल चळवळीचा’ एक भाग बनली. पुढे कासिम ‘अमल मुव्हमेंट’पासून वेगळे झाले. त्यांनी 1980 च्या दशकाच्या सुऊवातीस हिजबुल्लाह स्थापन करण्यास मदत केली. ते समूहाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक आहेत.