For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृहज्योती पुनर्तपासणीसाठी हेस्कॉमकडून उद्यापासून कॅम्प

06:29 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
गृहज्योती पुनर्तपासणीसाठी हेस्कॉमकडून उद्यापासून कॅम्प
Advertisement

शहराच्या दक्षिण भागासाठी सहा ठिकाणी होणार नोंदणी, 31 ऑगस्ट अंतिम मुदत

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

गृहज्योती योजनेच्या पुनर्तपासणीसाठी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेट दिली. परंतु काही घरांमध्ये घरमालकांची भेट न झाल्याने अद्याप काही प्रमाणात पुनर्तपासणीचे काम झालेले नाही. यासाठीच शहराच्या दक्षिण भागासाठी सहा ठिकाणी कॅम्प सुरू करण्यात येणार आहे. 24 ते 31 ऑगस्ट दरम्यान हे कॅम्प सुरू राहणार असून, नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

Advertisement

काही ठिकाणी घरांचे दरवाजे बंद होते, तर कुटुंबातील सर्वच नोकरदार असल्याने वेळेत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पुनर्नोदणीचे काम रखडले. शहापूर, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ, भाग्यनगर, हिंदवाडी, मजगाव, ब्रह्मनगर, उद्यमबाग, राणी चन्नम्मानगर व काँग्रेस रोड येथील ग्राहकांसाठी हेस्कॉमकडून कॅम्प आयोजित करण्यात आले आहे.

31 ऑगस्टपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन

गृहज्योती योजनेच्या पुनर्तपासणीसाठीचे मोजकेच दिवस शिल्लक आहेत. अद्याप ज्या ग्राहकांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी 31 ऑगस्टपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच ग्राहक भाड्याने असेल तर भाडे करारपत्र व जात प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. नागरिकांनी या कॅम्पच्या दरम्यान पुनर्तपासणी करून हेस्कॉमला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या ठिकाणी सुरू होणार कॅम्प

रेल्वे स्टेशनसमोरील हेस्कॉम उपविभाग कार्यालय 2, शहापूर पोलीस स्टेशनसमोरील हेस्कॉम तक्रार निवारण केंद्र, भाग्यनगर सहावा क्रॉस येथील पोलीस चौकी, गोवावेस येथील हेस्कॉम कार्यालय, शांतीनगर टिळकवाडी येथील दत्त मंदिर व उद्यमबाग येथील हेस्कॉम कार्यालयात कॅम्प सुरू केला जाणार असून, या ठिकाणी गृहज्योतीसाठीची पुनर्तपासणी केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.