हेस्कॉमकडून मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युततारा हटविल्या
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेस्कॉम उपविभाग-3 च्या कार्यक्षेत्रातील मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युततारा हटविण्यात आल्या आहेत. तर काही तारांची उंची वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली आहे. श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील धोकादायक तारा हटविण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावांची पाहणी करून खबरदारी घेण्यात आली आहे. सुमारे 74 गणेश मंडपांना भेटी देऊन हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. वीजतारांना स्पर्श होणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. हेस्कॉमच्या साहाय्यक अभियंत्यांच्या देखरेखीखाली अनेक सुरक्षितता उपक्रम राबविण्यात आले असून गणेशोत्सव काळात कोणतीही गैरसोय होऊ नये, कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. तरीही धोकादायक व लोंबकळणाऱ्या तारा, टीसी, धोकादायक खांब दिसून आल्यास नागरिकांनी हेस्कॉमच्या निदर्शनास आणावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.