हेस्कॉमकडून विसर्जन मार्गाची पाहणी
► त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
विसर्जन मिरवणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने मंगळवारी शहर हेस्कॉम विभागाच्यावतीने विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली. विसर्जन मार्गावर कोठेही लहानसहान विजेचे धोके निर्माण होऊ नयेत, याची नोंद करून घेण्यात आली. तसेच संबंधित नागरिकांनाही सूचना करण्यात आली आहे.
हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर, साहाय्यक कार्यकारी अभियंता सुमंगला बजंत्री यांच्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली. विजर्सन मार्गावरील हेस्कॉमचे फीडर पिलर बॉक्स, ट्रान्स्फॉर्मर, वीजवाहिन्या यांचा आढावा घेण्यात आला.
गणपत गल्ली येथे ट्रान्स्फॉर्मरखाली बसून काही महिला व्यापार करताना दिसून आल्या. ट्रान्स्फॉर्मरखाली व्यवसाय करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे असे प्रकार करू नयेत, अशी सूचना करण्यात आली. त्याबरोबरच अधिकाऱ्यांनीही काही ठिकाणी सुरक्षा घेण्यास सांगण्यात आले. यावेळी मंडळांनाही भेटी देऊन त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात आली.