हेरवाडकर, झेवियर्स, कनक, केएलई उपांत्य फेरीत
मृदुला सामंत स्मृती फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : एसकेई सोसायटी-जीएसएस महाविद्यालय व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मृदुला सामंत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व सामन्यांतून कनकने सेंटमेरीजचा, सेंट झेवियर्सने चिटणीसचा, केएलईने सेंट पॉल्सचा तर एम.व्ही. हेरवाडकरने संतमीराचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात कनक मेमोरियल संघाने सेंट मेरिजचा टायब्रेकरमध्ये 4-2 असा पराभव केला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला मेरीजच्या गौरव पाटीलने गोल करण्याची संधी दवडली. 22 व्या मिनिटाला कनक मेमोरियलच्या प्रवीण बी.ने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. शेवटी पंचांनी हा सामना टायब्रेकर नियमावरती खेळविण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये कनक मेमोरियलने 4-2 असापराभव केला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्यासामन्यात सेंट झेवियर्सने जी. जी. चिटणीसचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात सहाव्या मिनिटाला झेवियर्सच्या मोहम्मद मोहीतच्या पासवर अर्सलानने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला अर्सलानच्या पासवर गौरव गोदवाणीने 2 दुसरा गोल केला. तर 36 व्या मिनिटाला सुफियनच्या पासवर गौरव गोदवाणीने तिसरा गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली. यासामन्यात चिटणीस संघाला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या सामन्यात केएलई संघाने सेंट पॉल्स संघाचा 1-0 असा पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. दुसऱ्या सत्रात 35 व्या मिनिटाला कुनालच्या पासवर अब्दुल ताशिलदाराने गोल करुन 1-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेंट पॉल्सने आक्रमक चढाया केल्या. पण त्यांना अपयश आले.
चौथ्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने संतमीराचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात 15 व्या मिनिटाला वेदांत पाटीलच्या पासवर ऋषभ बळ्ळारने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 20 व्या मिनिटाला संतमीराच्या अब्दुलच्या पासवर नवाजने गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या रितेश कदमच्या पासवर ऋषभ बळ्ळारने दुसरा गोल करुन 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संतमीराने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते प्रयत्न सफल ठरले. याच दरम्यान मुलींच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धांनाही प्रारंभ होणार असून उद्घाटनाचा सामना संतमीरा वि. केएलई यांच्यात दुपारी 4 वाजता खेळविण्यात येणार आहे. तर दुसरा सामना सेंट झेवियर्स वि. सेंट जोसेफ यांच्यात दुपारी 5 वाजता.
उपांत्यफेरीचे सामने
- एम. व्ही. हेरवाडकर वि. केएलई इंटरनॅशनल दुपारी 2 वाजता
- सेंट झेवियर्स वि. कनक मेमोरियल दुपारी 3 वाजता