हेरवाडकर, केएलएस, सेंटमेरीज विजयी
मृदुला सामंत चषक फुटबॉल स्पर्धा, ज्ञान प्रबोधन-केएलई सामना बरोबरीत
बेळगाव : एसकेई सोसायटी जीएसएस महाविद्यालय व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मृदुला सामंत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत एम. व्ही. हेरवाडकर संघाने भरतेचा, सेंट मेरीजने महिला विद्यालयाचा, केएलएसने मुक्तांगणाचा पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले तर ज्ञानप्रबोधनला केएलईने बरोबरीत रोखले. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मृदुला सामंत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने भरतेशचा 2-0 असा पराभव केला. सातव्या मिनिटाला हेरवाडकरच्या शुभम कोरेच्या पासवर ऋषभने गोल करुन 1-0 ची पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मिनिटाला श्रवण घोणेच्या पासवर दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी एम. व्ही. हेरवाडकरला मिळवून दिली. या सामन्यात भरतेश संघाला गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या सामन्यात सेंट मेरीजने एम.व्हीएम. महिला विद्यालयाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 16 व्या मिनिटाला सेंट मेरीजच्या गिरीनाथ पाटीलच्या पासवर आदी तारकरने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 15 व्या मिनिटाला आदी तारकारच्या पासवर उमरसय्यदने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. या सामन्यात तीन खेळाडूंना लाल कार्ड दाखविण्यात आले. तिसऱ्या सामन्यात केएलएसने मुक्तांगणचा 6-1 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला मुक्तांगणच्या सिद्धेश जाधवने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 6 व्या मिनिटाला केएलएसच्या प्रणव लाडने बरोबरीचा गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधली. 17 व 21 व्या मिनिटाला कर्णधार नील बसरीकट्टीने सलग दोन गोल करुन 3-1 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 24 व 27 व्या मिनिटाला प्रणव लाडने सलग दोन गोल करीत 5-1 अशी आघाडी मिळवून दिली. 36 व्यामिनिटाला श्रेय कंग्राळकरने 6 वा गोल करीत 6-1 अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात ज्ञानप्रबोधनला 1-1 अशा बरोबरीत रोखले. या सामन्यात 7 व्या मिनिटाला ज्ञानप्रबोधनच्या सिद्धांत सुरेख गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 39 व्या मिनिटाला केएलईच्या वंश बी. ने डी बाहेरुन सरळ फटका गोल मुखात मारुन 1-1 अशी बरोबरीत करुन सामन्यात रंगत निर्माण केली.
शनिवारचे सामने
- शेख सेंट्रल वि. कनक मेमोरियल सकाळी 8 वाजता
- कॅन्टोन्मेंट वि. ज्ञानप्रबोधन सकाळी 9 वाजता
- संतमीरा वि. सर्वोदय सकाळी 10 वाजता
- सेंटझेवियर्स वि. सेंटपॉल्स सकाळी 11 वाजता