15 कोटींचे हेरॉइन म्यानमार सीमेवर जप्त
दोघांना अटक : मोठ्या तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश
वृत्तसंस्था/इंफाळ
म्यानमारमधून भारतात होणाऱ्या ड्रग्ज तस्करीविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एक मोठे यश मिळवले आहे. एनसीबी इंफाळ झोनल युनिटने भारत-म्यानमार सीमेजवळ 7.312 किलो उच्च दर्जाचे हेरॉइन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. या कारवाईत दोन आंतरराष्ट्रीय तस्करांना अटक करण्यात आल्यामुळे म्यानमारमधून भारतात तस्करी करण्यात येत असलेल्या एका मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश झाला
एनसीबीला बुधवार, 7 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या विश्वासार्ह गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने भारत-म्यानमार सीमेजवळ एक बोलेरो वाहन रोखले. या वाहनाच्या तपासणीत मोठा 7.312 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. सदर हेरॉइन 638 साबणाच्या डब्यांमध्ये लपवून ठेवले होते. ही खेप म्यानमारमधील हचिन शहरातून आणण्यात आली होती. मणिपूरच्या जंगलभागातून असलेल्या आडवाटेने ही तस्करी केली जात होती. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून गिन्खामलियान आणि मंगबोई सिमटे अशी त्यांची नावे आहेत. दोघेही मणिपूरमधील चुराचंदपूर जिह्यातील माता-मुलताम भागातील रहिवासी आहेत.
तपासात धक्कादायक खुलासे
अटक करण्यात आलेले तस्कर सीमेपलीकडून ड्रग्ज आणणाऱ्या आणि भारतात पुरवठा करणाऱ्या नेटवर्कचा भाग होते. जप्त केलेले हेरॉइन उच्च दर्जाचे होते आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज बाजारात वापरण्यासाठी पाठवण्यात आले होते. या नेटवर्कमागे कोण लोक आहेत, म्यानमारमध्ये पुरवठा साखळी कशी कार्यरत आहे आणि भारतातील कोणत्या राज्यांना ते पुरवायचे होते? या सर्व पैलूंची सखोल चौकशी सुरू आहे.
तस्करीसाठी छुप्या मार्गांचा वापर
पारंपरिक तस्करी मार्गांवरील वाढत्या कारवाईमुळे अलिकडच्या काळात ड्रग्ज माफिया त्यांचे मार्ग आणि पद्धत बदलत आहेत. आता, तस्कर पोलीस चौक्या, सुरक्षा छावण्या आणि शहरी पाळत टाळण्यासाठी शहरे आणि महामार्गांऐवजी घनदाट जंगले आणि नदीमार्गांचा वापर करत आहेत. ही नवीन पद्धत संपूर्ण ईशान्य भारतात वाढत्या प्रमाणात उदयास येत आहे. गेल्या महिन्यात एनसीबी गुवाहाटी झोनल युनिटने मणिपूरच्या जिरीबाम भागातून अंदाजे 7 किलो हेरॉइन जप्त केल्यानंतर तस्करीच्या बदलत्या पद्धतीची पुष्टी झाली. यानंतर, एनसीबीने सीमावर्ती भागात पाळत वाढवतानाच गुप्तचर नेटवर्कही आणखी मजबूत केले.