हिरो मोटर्सचा येणार आयपीओ
नवी दिल्ली :
दुचाकी क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी हिरो मोटर्स कंपनी यांनी आपला आयपीओ आणण्याची तयारी चालवली आहे. कंपनी या आयपीओअंतर्गत आगामी काळात 900 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती आहे.
कंपनीने अलीकडेच आयपीओसंदर्भात आपला अर्ज सविस्तर कागदपत्रांसह बाजारातील नियामक सेबीकडे सादर केला आहे. यामध्ये कंपनी 500 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग सादर करणार आहे तर दुसरीकडे ऑफर फॉर सेलअंतर्गत 400 कोटी रुपयांचे समभाग सादर केले जाणार आहेत. यापैकी 250 कोटींचे समभाग हे ओ पी मुंजाल यांचे असतील.
यासोबत भाग्योदय इन्वेस्टमेंटस् आणि हिरो सायकल्स यांच्याकडून प्रत्येकी 75 कोटींचे समभाग सादर केले जातील. या आयपीओतील रक्कमेचा वापर हा कंपनीवरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी केला जाणार आहे. बुद्ध नगर, उत्तर प्रदेशमधील कारखान्याची क्षमता वाढवण्याचा विचारही कंपनी करते असून यासाठीही आयपीओतील रक्कम वापरली जाणार आहे. हिरो मोटर्स इलेक्ट्रीकसह बिगर इलेक्ट्रीक दुचाकी सादर करते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 0.9 टक्के वाढीसह 1064 कोटी रुपयांचा महसुल कंपनीने प्राप्त केला आहे. कंपनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार विदेशात संयुक्त भागीदारीतून केला आहे. आयपीओचे व्यवस्थापन आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड, डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेड आणि जेएम फायनॅन्शीयल लिमिटेड यांच्याकडे आहे.