हिरो मोटोकॉर्पेने केली विक्रमी दुचाकींची विक्री
32 दिवसात 14 लाख दुचाकींचा खप : उत्सवी हंगाम फळला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी हिरो मोटोकॉर्पला यंदाचा उत्सवी हंगाम अत्यंत लाभदायी ठरला आहे. 32 दिवसांच्या काळामध्ये कंपनीने विक्रमी 14 लाख दुचाकी वाहनांची विक्री करण्यामध्ये यश मिळविले आहे.
दुचाकी विक्रीतील भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून हिरो मोटोकॉर्पचा गौरव केला जातो. सदरच्या कंपनीने उत्सवी काळामध्ये 14 लाख इतक्या विक्रमी दुचाकींची विक्री करून मोठे यश मिळविले आहे. या योगे 2019 मधील दुचाकी विक्रीचा सर्वोच्च विक्रम कंपनीने मोडीत काढला आहे. 2019 मध्ये 12.7 लाख दुचाकींची विक्री कंपनीने केली होती. यंदा ग्रामीण भागामध्ये कंपनीच्या दुचाकींना चांगला प्रतिसाद लाभला असून यामध्ये शहरीभागाने देखील मागणी लक्षणीय नोंदली असल्याचे दिसून आले आहे.
भारतभर मागणी अधिक
मध्यभारत, उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागामध्ये कंपनीच्या दुचाकींना ग्राहकांनी चांगली मागणी नोंदवली असल्याचे दिसून आले आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये हिरोच्या दुचाकींना ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली आहे. परिणामी कंपनीचा उत्साह अधिक द्विगुणीत झाला आहे.
काय म्हणाले सीईओ...
गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये 19 टक्के वाढ दर्शविली आहे. हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निरंजन गुप्ता म्हणाले की, उत्सवी काळात झालेल्या दुचाकीतील विक्रमी विक्रीने आम्ही उल्ल्हासीत झालो आहोत. ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. ब्रन्ड हिरोबाबत ग्राहकांचा विश्वास कायम असल्याचे पाहून आपल्याला अत्यानंद झाला आहे. पुढील काळातही नव्या वाहनांच्या लाँचिंगवर भर देण्यासोबत चांगली सेवा देण्यासाठी कंपनी सज्ज असणार आहे.