हिरो मोटोकॉर्पने अॅथरमध्ये घेतली हिस्सेदारी
हिस्सेदारी 32 टक्क्यांवर पोहचली : 1758 कोटींचा व्यवहार
वृत्तसंस्था, मुंबई
दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरोमोटो कॉर्प यांनी इलेक्ट्रिक वाहन कंपनी अॅथर एनर्जीमध्ये नवी हिस्सेदारी खरेदी केली आहे. कंपनीने ही माहिती नुकतीच शेअर बाजाराला दिली आहे. या अंतर्गत आता हिरोमोटो कॉर्पची अॅथरमध्ये एकंदर 32.8 टक्के हिस्सेदारी राहणार आहे.
सदरची हिस्सेदारी कंपनीने 1758 कोटी रुपयांमध्ये नुकतीच खरेदी केली आहे. शुक्रवारी ब्लॉकडील अंतर्गत हिरोने अॅथरमधील 1.18 कोटी समभाग खरेदी केले. हा करार प्रति समभाग 1480 रु. याप्रमाणे झाला आहे. याकरीता कंपनीने 1758 कोटी रु. मोजले आहेत. 25 ऑगस्ट रोजी हिरोमोटो कॉर्पची अॅथरमधली हिस्सेदारी 29.8 टक्के इतकी होती. हिरोमोटो कॉर्प ही आधीपासूनच अॅथरची सर्वाधिक हिस्सेदारी असणारी कंपनी राहिली आहे. हिस्सेदारी वाढल्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी व्यवसायामध्ये कंपनीची उपस्थिती आता अधिक मजबूत होणार आहे.
स्पर्धा होणार रंगतदार
सध्याला इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीमध्ये मोठी वाढ पहायला मिळत असून स्पर्धक कंपन्यांच्या दुचाकी विक्रीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊनच हिरोमोटो कॉर्पने अॅथरमध्ये आपली हिस्सेदारी अधिक मजबूत करत ही बाजारपेठ अधिक स्पर्धक करण्याच्या दिशेने पाऊल उचललेले आहे. पारंपरिक पेट्रोल ऐवजी आता इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यामध्ये ओला आणि टीव्हीएस तसेच बजाज यांनी आपली बाजारातील हिस्सेदारी वाढवली आहे.
अॅथरची नवी ‘कोणार्क’ स्कूटर लाँच
नवी दिल्ली : इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रात नाव कमवू पाहणारी कंपनी अॅथर एनर्जीने नुकतीच आपली नवी कोणार्क ही इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. जिची किमत 99 हजार रुपये इतकी असणार असल्याचे समजते. यातील एका व्हेरीयंटची स्कूटर 100 किलोमीटरचे मायलेज देईल जिची किमत 99 हजार 999 रुपये इतकी असणार आहे तर दुसरीकडे 125 किलोमीटर मायलेज देणाऱ्या गाडीची किमत 1 लाख 21 हजार 999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. दोन्ही गाड्यांची विक्री सप्टेंबरमध्ये सुरु होईल. याखेरीज 161 किमीचे मायलेज देणारे मॉडेलही लाँच केले जाणार असून जिची किमत 1 लाख 44 हजार 999 रुपये इतकी असेल, असे सांगितले जात आहे. ही गाडी आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत बाजारात उतरु शकते. कोणार्कची किमत ही अॅथरच्याच रिटझापेक्षा कमी आहे तसेच बाजारात आता ही गाडी थेटपणे टीव्हीएस व बजाज हिच्याशी स्पर्धा होईल. टीव्हीएस आयक्युब व बजाज चेतक सी 2501 यांची किमत साधारणपणे एवढीच आहे.