हिरो मोटोच्या विक्रीत 17 टक्क्यांची घट
फेब्रुवारीमध्ये 3.88 लाख मोटारसायकली आणि स्कूटरची विक्री झाल्याची नोंद
नवी दिल्ली :
जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारीमध्ये त्यांची एकूण विक्री वर्षाच्या आधारे 17 टक्क्यांनी घसरून 3,88,068 युनिट्सवर आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 4,68,410 युनिट्स विकल्या होत्या. हिरो मोटोकॉर्पने फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 3,88,068 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. त्यापैकी 3,57,296 युनिट्स देशांतर्गत बाजारात विकल्या गेल्या आणि 30,772 युनिट्स निर्यात करण्यात आल्या.
अहवालांनूसार, हिरो मोटोकॉर्पची स्प्लेंडर मालिका, एचएफ डिलक्स आणि एक्सट्रीम 125आर सोबतच त्यांच्या डेस्टिनी आणि झूम स्कूटर्सची चांगली विक्री होत आहे. त्याच वेळी, हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक वाहन ब्रँड विदाने 6,200 युनिट्सच्या विक्रीसह स्थिर वाढ नोंदवली आहे. असे म्हटले जात आहे की या वर्षी विडा ब्रँडची आणखी नवीन उत्पादने येतील.
जागतिक बाजारपेठेत 33 टक्के वाढ
जागतिक बाजारपेठेत भारतीय कंपनी हिरो मोटोकॉर्पची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढत आहे. हिरो मोटोकॉर्पने फेब्रुवारी 2025 मध्ये 30,000 हून अधिक वाहनांची निर्यात केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्के वाढ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जागतिक बाजारात कंपनीने 30,000 हून अधिक युनिट्स विकल्याचा हा सलग तिसरा महिना आहे.
हिरो मोटोकॉर्पची डीलरशिप
हिरो मोटोकॉर्पकडे प्रीमियम ग्राहकांसाठी 64 प्रीमिया डीलरशिप रूम आहेत, जिथे हिरो, विदा आणि हार्ले-डेव्हिडसन उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. कंपनीच्या 125 सीसी स्कूटर सेगमेंटला बळकटी देण्यासाठी, डेस्टिनी 125 ची डिलिव्हरी आधीच सुरू झाली आहे आणि झूम 125 ची विक्री देखील लवकरच सुरू होईल. आगामी लग्नसराई आणि नवीन उत्पादन लाँचमुळे, पुढील काही महिन्यांत विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.