दुसऱ्या टप्प्यातील कामांना हेरिटेजचा ग्रीन सिग्नल
कोल्हापूर :
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना शुक्रवारी हेरिटेज कमिटीने मंजूरी दिली. दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी 21 लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत, यामध्ये खासबाग मैदानाची भिंत, खासबागचे स्टेज, दालनाच्या बाजूचे दोन जिने यांचे काम करण्यात येणार आहे. महापालिकेने सादर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये काही बदल सुचवत हेरीटेज समितीनेही मान्यता दिली आहे. आठ ते दहा दिवसांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
केशवराव भोसले नाट्यागृहाला 8 ऑगस्ट रोजी आग लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यागृह उभारण्यासाठी 25 कोटींचा निधी जाहीर केला. नगरविकास विभागाने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत नाट्यागृह व खासबाग मैदानाचे नूतनीकरण, जतन, संवर्धन व पुनर्बांधणीच्या कामासाठी 25 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर केला. यातील पहिल्या टप्प्यातील 7 कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ही कामे अंतिम टप्प्यात आली असून, 10 फेब्रुवारी पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे टार्गेट महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आले आहे.
दरम्यान शुक्रवारी शहर हेरिटेज कमिटीची बैठक राजारामपुरी येथील कार्यालयात पार पडली. महापालिकेने कमिटीसमोर दुसऱ्या टप्प्यातील कामांचे आराखडे सादर केले. यामध्ये खासबाग मैदानाची संरक्षक भिंत, केशवराव भोसले नाट्यागृहाच्या शेजारील दोन जिने, कलादालनाची इमारत, ग्रीन रुम यांचा समावेश आहे. यामध्ये कमिटीच्या वतीने काही बदल सुचविण्यात आले. महापालिकेने हे बदल मान्य केले. यानंतर समितीच्या सदस्यांनी यास मान्यता दिली. यामुळे आता केशवरा भोसले नाट्यागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही गती येणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये या कामांची निविदा काढण्यात येणार आहे.
या बैठकीस अमरजा निंबाळकर, आर्किटेक्चर प्रशांत हडकर, उदय गायकवाड, उपशहररचनाकार रमेश म्हस्कर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, स्ट्रक्टवेल कंपनीचे चेतन रायकर, सुनिल पवार उपस्थित होते.