येथे सजतो जुन्या प्रियकरांचा बाजार
वर्षात एकदा होते भेट, गमावलेल्या प्रेमाची होते भेट
व्हिएतनामच्या उत्तर भागातील पर्वतीय क्षेत्रांमध्ये एक अशी अनोखी परंपरा आहे, जी जगभरातील लोकांना थक्क करते. येथे वर्षात केवळ एकदा असा बाजार भरतो, ज्यात लोक स्वत:च्या जुन्या प्रेमाला भेटण्यासाठी येत असतात.व्हिएतनामचा प्रसिद्ध खौ वाई लव मार्केट किंवा चो तिन्ह खौ वाई एक असे स्थान आहे, जेथे ताटातूट झालेल्या प्रेयसी-प्रियकर वर्षात एक दिवस एकत्रित येतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात, गाणी गातात आणि मग परत स्वत:च्या वर्तमान जीवनात परततात. सर्वात चकित करणारी बाब म्हणजे अनेकदा वर्तमान पती किंवा पत्नीही त्यांच्यासोबत असते, परंतु कुठलीच जळफळाट किंवा भांडण होत नाही.
जुनी आहे परंपरा
ही परंपरा सन्मान, समंजसपणा आणि मानवीय भावनांचे अनोखे उदाहरण आहे. हा बाजार व्हिएतनामच्या उत्तरेस स्थित मेओ वाक जिल्ह्याच्या खौ वाई समुदायाकडून भरविला जातो. पूर्वी हा जियांग प्रांतात होता, परंतु प्रशासकीय बदलांनंतर आता हे तुयेन क्वांग प्रांताचा हिस्सा आहे. हे क्षेत्र डोंग वान कार्स्ट पठाराचा हिस्सा आहे, जे युनेस्को ग्लोबल जियोपार्कच्या स्वरुपात ओळखले जाते. येथील खडकाळ पर्वत, वळणदार रस्ते आणि हिरवाईने नटलेल्या खोऱ्यांमुळे या मिलनाला आणखी रोमांचक स्वरुप मिळते. दरवर्षी तिसऱ्या चंद्र मासाच्या 27 तारखेला हे आयोजन होते, जे सर्वसाधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यात होते, पूर्वी हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम होता, परंतु आता सांस्कृतिक घडामोडींसोबत हा कार्यक्रम दोन ते तीन दिवसांपर्यंत चालतो. या अनोख्या बाजाराची सुरुवात सुमारे 100 वर्षांपूर्वी 1919 च्या आसपास झाल्याचे मानले जाते.
अशी झाली सुरुवात
याचे मूळ एका वेदनादायी प्रेमकहाणीने सुरू होते. वदंतेनुसार नुंग समुदायाचा एक युवक बा आणि गियाई समुदायाची युवती उत परस्परांवर प्रचंड प्रेम करत होते. बा गरीब होता, परंतु सुंदर, गाणे अन् बासरीवादनात पारंगत होता. उत एका समुदायाच्या प्रमुखाची मुलगी होती. दोघेही वेगवेगळ्या समुदायांचे होते आणि त्यांच्या प्रथा-परंपराही वेगळ्या होत्या. परिवारांनी त्यांच्या नात्याला विरोध केला. काही कहाण्यांमध्ये दोन्ही समुदायांमध्ये संघर्ष सुरू होत रक्तपातही होऊ लागल्याचे सांगण्यात येत. प्रेमी जोडप्याने स्थिती समजून घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांनी एक वचन दिले. दरवर्षी तिसऱ्या चंद्र मासाच्या 27 तारखेला आपण खौ वाईच्या खोऱ्यात भेटणार, परस्परांना गाणे ऐकविणार, वर्षभरातील गोष्टी सांगणार आणि मग आपाआपल्या घरी परतण्याची शपथ घेतली. वर्षांपर्यंत त्यांनी हे वचन पाळले, वृद्धत्वातही ते येथे आले आणि अखेरीस परस्परांच्या मिठीत या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणीत तेथे मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. आजही या सणाची सुरुवात या मंदिरांमध्ये पूजा करूनच होत असते.