युपी वॉरियर्स संघात हिलीच्या जागी हेन्री
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या युपी वॉरियर्स संघातील ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅलिसा हिलीला दुखापत झाल्याने ती या संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने तिच्या जागी चिनेली हेन्रीला बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. त्याच प्रमाणे आरसीबी संघामध्ये हिथेर ग्रॅहॅम आणि किम गॅरेथ यांना बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
महिलांची टी-20 प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धा 14 फेब्रुवारीपासून बडोदा येथे खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युपी वॉरियर्स संघातील ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू अॅलिसा हिली हिच्या पायाला दुखापत झाल्याने ती या संपूर्ण स्पर्धेत खेळण्यासाठी उपलब्ध राहू शकणार नाही. हिलीच्या जागी आता चिनेली हेन्रीला संघात स्थान देण्यात आले आहे. विंडीजची चिनेली हेन्री हिने 62 टी-20 सामन्यात फलंदाजीत 473 धावा तर गोलंदाजीत 22 गडी बाद केले आहेत. युपी वॉरियर्स संघाने हेन्रीला 30 लाखांच्या बोलीवर खरेदी केले आहे.
आरसीबीत बदल
महिलांच्या तिसऱ्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेसाठी विद्यमान विजेत्या रॉयल चॅलेजर्स-बेंगळूर (आरसीबी) संघामध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 35 वर्षीय सोफी डिव्हाईन आणि केटी क्रॉस यांच्या जागी हिदर ग्रॅहॅम आणि किम गार्थ यांना बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. हिथेर ग्रॅहॅम ही ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलु म्हणून ओळखली जाते. तीने आतापर्यंत 5 टी-20 सामन्यात 8 गडी बाद केले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या किम गॅरेथने 59 टी-20 सामन्यात, 56 वनडे सामन्यात आणि 4 कसोटी सामने खेळले आहेत. तिने टी-20 प्रकारात 764 धावा जमविल्या असून 49 गडी बाद केले आहेत. किम गॅरेथ हिने गेल्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत गुजरात जायंट्सचे प्रतिनिधीत्व केले होते. आता आरसीबीने ग्रॅहॅम आणि गॅरेथ यांना प्रत्येकी 30 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे.