हेम्माडगा रस्ता वाहतुकीसाठी बंद
मणतुर्गा रेल्वे फाटकानजीक दोन महिने चालणार रस्त्याचे काम
खानापूर : तालुक्यातील रुमेवाडी क्रॉसपासून हेम्माडगा, अनमोड येथे जाणाऱ्या रस्त्यावर मणतुर्गाजवळील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम आणि भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बंद करण्यात आला आहे. याबाबची सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुखांनी एका पत्राद्वारे जाहीर केली आहे. या रस्त्यावरून गोवा राज्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. त्यामुळे हा रस्ता बंद झाल्याने प्रवाशांनी याची नेंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रुमेवाडी क्रॉस येथे बॅरिकेड्स लावून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर मणतुर्गाजवळील रेल्वेफाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, अशी मागणी साहाय्यक अभियंता दक्षिण, पश्चिम रेल्वे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली होती. या पत्राची दखल घेऊन आणि पर्यायी रस्त्याचे नियोजन करून जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर-हेम्माडगा रस्ता वाहतुकीसाठी मार्चअखेरपर्यंत बंद करण्याचे जाहीर केले आहे. या भागातील नागरिकांसाठी असोग्यावरून खानापूर तसेच तिवोलीवरून गुंजी संपर्क रस्त्याचा वाहतुकीसाठी उपयोग करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आणि या भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी.