For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारखंडमध्ये हेमंत सोरेन आज एकटेच घेणार शपथ

07:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
झारखंडमध्ये हेमंत सोरेन आज एकटेच घेणार शपथ
Advertisement

मंत्रिमंडळ विस्तार नंतर : राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह 10 पक्षांतील 18 नेत्यांना सोहळ्याचे आमंत्रण

Advertisement

वृत्तसंस्था/रांची

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन गुरुवार, 28 नोव्हेंबरला एकटेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आमदारांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. 10 पक्षांचे 18 मोठे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हेमंत सोरेन हे झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून मोराबादी मैदानावर शपथ घेतील. शपथविधीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात हेमंत सोरेन एकटेच शपथ घेणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मीर अहमद यांनी बुधवारी दिली. आमदारांनी अद्याप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला नाही, त्यासाठी 29 नोव्हेंबरला बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे हेमंत सोरेन एकटेच शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. हेमंत सोरेन यांच्या राज्याभिषेकाला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीचे अनेक बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय सपा प्रमुख अखिलेश यादव आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी हेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात.

Advertisement

झामुमोचा 56 जागांवर विजय

झारखंडमध्ये, हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीने शानदार पुनरागमन केले आहे. ‘झामुमो’ने 81 सदस्यीय विधानसभेत 56 जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्तास्थान मिळवले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 81 पैकी केवळ 24 जागा जिंकता आल्या. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला असला तरी पक्षाला येथे यश मिळू शकले नाही.

मोराबादी मैदानावरील भव्य शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी चार वाजता म्रोहराबादी मैदानावर अनेक नेते जमणार आहेत. त्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी रांचीच्या रस्त्यांवर चार हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय संपूर्ण मोहराबादी मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. सोहळ्यावेळी वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी विशेष दलांच्या हाती राहणार आहे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक व्हीआयपी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रांची विमानतळ ते मोराबादी मैदानापर्यंत विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.