For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेमंत सोरेन बुधवारी ईडीसमोर पोहोचणार

06:18 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेमंत सोरेन बुधवारी ईडीसमोर पोहोचणार
Advertisement

मुख्यमंत्री निवासाकडून ई-मेलद्वारे माहिती : तपास यंत्रणा दिवसभर मागावर

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक सतत समन्स बजावून चौकशीला हजर राहण्यासाठी पाचारण करत आहे. सोमवारीही अंमलबजावणी संचालनालयाचे पथक दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. याचदरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून ईडीला एक मेल पाठवण्यात आला असून त्यामध्ये मुख्यमंत्री हेमत सोरेन बुधवार, 31 जानेवारी रोजी ईडीसमोर हजर होतील, असे सांगण्यात आले आहे.

Advertisement

हेमंत सोरेन यांच्या चौकशीसाठी 20 जानेवारीला ईडीची सात सदस्यीय टीम मुख्यमंत्री निवासामध्ये पोहोचली होती. यावेळी त्यांची बराचवेळ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात ईडीने हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात तब्बल दहाव्यांदा समन्स बजावत 31 तारीखपूर्वी ईडी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, सोमवारीच काही तपास अधिकारी त्यांच्या शोधत असल्याचे दिसून आले. हेमंत सोरेन दिल्लीत असल्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. दिल्लीतील ईडी टीमच्या या कारवाईमुळे झारखंडमधील राजकीय गोंधळ वाढला होता.

‘झामुमो’चे कार्यकर्ते रस्त्यावर

मुख्यमंत्री वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेले आहेत आणि ईडीने त्यांना 31 जानेवारीपर्यंत वेळ दिलेली असताना अधिकारी चौकशीसाठी का मागे लागले आहेत? असा प्रश्न झामुमो नेत्याने उपस्थित केला आहे. ईडी हेमंत सोरेन यांना जाणूनबुजून त्रास देत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. रांचीमध्ये ईडीविरोधात निदर्शने करण्यासाठी सोमवारी झामुमोचे कार्यकर्ते एकवटले होते. हेमंत सोरेनना अटक झाल्यास झारखंड पेटेल, असा इशारा दिला जात आहे. याचदरम्यान रांचीमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाशिवाय इतर व्हीव्हीआयपी भागातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

अटकेच्या भीतीमुळे सोरेन यांची पळापळ : भाजप

ईडीकडून अटकेची कारवाई होण्याच्या भीतीमुळे हेमंत सोरेन यांची पळापळ सुरू असल्याचा दावा भाजपने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईच्या भीतीने मुख्यमंत्री गेल्या 18 तासांपासून ‘फरार’ असल्याचे झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन करत झारखंडची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.

Advertisement
Tags :

.