हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री
जामीन मिळाल्यानंतर सहा दिवसात राज्याची सूत्रे घेतली हाती
वृत्तसंस्था /रांची
झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आता हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर सहाव्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. चंपाई सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांनी सहकाऱ्यांसह राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी हेमंत सोरेन यांना शपथविधीसाठी निमंत्रित केले.
हेमंत सोरेन यांना गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने जमिनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकीत चंपाई सोरेन यांच्या जागी हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री बनविण्यावर एकमत झाले. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर आता शपथही ग्रहण केली. तत्पूर्वी, सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी एकमताने हेमंत सोरेन यांची झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली. चंपाई सोरेन यांनी राजीनामा देताना आपण स्वत:च्या इच्छेने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.
हेमंत सोरेन यांना बहुमत सिद्ध करणे सोपे
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हेमंत सोरेन यांना झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सिद्ध करावा लागणार आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी फ्लोर टेस्ट सोपी होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. झारखंड विधानसभेत सध्या 76 सदस्य असून बहुमतासाठी 39 मतांची आवश्यकता आहे. पक्षाच्या परिस्थितीत जेएमएम-काँग्रेस-आरजेडीकडे बहुमतापेक्षा जास्त मते आहेत. हेमंत सोरेन यांच्यावतीने सरकार स्थापनेचा दावा करताना 44 आमदारांच्या स्वाक्षरीचे समर्थनपत्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर करण्यात आले आहे.