हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री
रांचीत घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ : ‘इंडिया’च्या नेत्यांची उपस्थिती
वृत्तसंस्था/रांची
हेमंत सोरेन यांनी गुरुवार, 28 नोव्हेंबरला पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. रांची येथे आयोजित एका भव्य समारंभात त्यांनी राज्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) नेत्याची मुख्यमंत्री म्हणून ही चौथी टर्म आहे. झारखंडची राजधानी रांचीच्या मोराबादी मैदानावर शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या नेत्यांचे कल्पना सोरेन यांनी स्वागत केले. कल्पना सोरेन गंडेया विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत.
झारखंडमधील शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यासोबतच झामुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नी रुपी सोरेनही शपथविधीवेळी उपस्थित होते.
याशिवाय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंड काँग्रेसचे राज्य प्रभारी गुलाम अहमद मीर, काँग्रेस नेते तारिक अन्वर, अपक्ष खासदार पप्पू यादव, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. हेमंत सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना सोहळ्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, पंतप्रधान शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. तथापि, त्यांनी हेमंत सोरेन यांना पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
झारखंडमध्ये ‘इंडिया’ आघाडीला 56 जागा
झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बरहेट मतदारसंघात हेमंत सोरेन यांनी भाजपच्या गमलियल हेम्ब्रम यांचा 39,791 मतांनी पराभव केला होता. झामुमोच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीने 81 सदस्यीय विधानसभेत 56 जागा जिंकून आपले बहुमत राखले, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 24 जागा मिळाल्या होत्या.