हेमंत निंबाळकर यांची बदली
पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने शुक्रवारी हेमंत निंबाळकर यांच्यासह पाच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची गुप्तचर खात्यात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावरून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे ते माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या आयुक्त म्हणून कार्यरत राहणार आहेत. तर गुप्तचर खात्याच्या एडीजीपीपदी एस. रवी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
हेमंत निंबाळकर हे 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे माहिती आणि जनसंपर्क खात्याबरोबरच गुप्तचर विभागाचीही जबाबदारी होती. आता त्यांची गुप्तचर विभागातून बदली करण्यात आली आहे. वाहतूक आणि रस्ते सुरक्षा विभागाच्या एडीजीपीपदी आर. हितेंद्र, पोलीस नेमणूक विभागाच्या एडीजीपीपदी एस. मुरुगन, गृहखात्याच्या मुख्य सचिवपदी के. व्ही. शरतचंद्र यांची बदली करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाच्या एडीजीपीपदी वर्णी लागलेल्या एस. रवी यांच्याकडे याआधी बेंगळूरच्या एडीजीपीपदाची जबाबदारी होती.