पोलीस दलाकडून आजपासून हेल्मेट जागृती सप्ताह
हेल्मेट वापरासंबंधीचे फायदे-तोटे समजावणार : विनाहेल्मेटधारकांवर दंडात्मक कारवाईही करणार
बेळगाव : दुचाकीस्वारांची सुरक्षितता व वाहन अपघात टाळण्यासाठी बेळगाव पोलिसांकडून सोमवार दि. 15 जूनपासून हेल्मेट जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता राणी कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात या अभियानाला चालना देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते अभियानाला चालना देण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन उपस्थित राहणार आहेत. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, शहर सशस्त्र दलाचे उपायुक्त वाय. पे. काशप्पन्नावर आदी उपस्थित राहणार आहेत.
आठवडाभर हे अभियान सुरू राहणार असून पहिल्या दिवशी 15 जून रोजी हेल्मेट जागृती अभियानाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी 16 रोजी शहर व उपनगरांतील ट्रॅफिक सिग्नलवर विनाहेल्मेट वाहने चालविणाऱ्या दुचाकीस्वारांबरोबर संवाद साधण्याबरोबरच पत्रके वाटण्यात येणार आहेत. तिसऱ्या दिवशी 17 रोजी शाळा-कॉलेजना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. याचवेळी वाहन अपघातांचे व्हिडिओ दाखवून हेल्मेट परिधान करण्यासंबंधी शपथ दिली जाणार आहे.
चौथ्या दिवशी 18 रोजी प्रमुख ट्रॅफिक सिग्नल व इतर ठिकाणी विनाहेल्मेट वाहने चालविणाऱ्यांची तपासणी करून जे दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करतात, त्यांना प्रमाणपत्र वितरित करून हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पाचव्या दिवशी हेल्मेटशिवाय इंधन नाही हा उपक्रम यशस्वी करून समाजमाध्यमावर यासंबंधीची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. सहाव्या दिवशी 20 रोजी रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनसीसी आदी संस्थांच्या सहभागातून हेल्मेट परिधान करण्यासंबंधी जागृती केली जाणार आहे. शेवटच्या दिवशी 21 रोजी दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करणारे व न करणाऱ्यांची आकडेवारी जमविण्यात येणार आहे. केवळ आठवडाभरापुरते अभियान न चालवता निरंतर हेल्मेट जागृतीचा उपक्रम केला जाणार आहे.