सागरी ड्रोनद्वारे पाडविले हेलिकॉप्टर
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनच्या सागरी ड्रोनने पहिल्यांदाच एखाद्या रशियन हेलिकॉप्टरला लक्ष्य केले आहे. ड्रोनद्वारे हल्ला होताच रशियाच्या हेलिकॉप्टरचा पायलट हादरून गेला होता. यासंबंधीची माहिती युक्रेनच्या इंटेलिजेन्ट सर्व्हिसकडून रेडिओ कॉल इंटरसेप्ट करण्यात आल्यावर समोर आली आहे.
काळ्या समुद्राच्या वर उ•ाण करत असलेल्या दोन रशियन हेलिकॉप्टर्सना युक्रेनच्या नेव्हल ड्रोनने लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात एक हेलिकॉप्टर पूर्णपणे नष्ट झाले तर दुसऱ्याचे नुकसान झाले आहे.
युक्रेनच्या मिलिट्री इंटेलिजेन्ट सर्व्हिसने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला असून यात रशियाच्या एमआय-8 हेलिकॉप्टरला युक्रेनच्या मागूरा व्ही5 नेव्हल ड्रोनच्या मदतीने पाडविल्याचे दिसून येते.
व्हिडिओत ड्रोन बोटच्या आसपास पाण्यावर गोळ्या बरसत असल्याचे दिसून येते. व्हिडिओत हेलिकॉप्टरची थर्मल इमेजही दिसून येत असून एक क्षेपणास्त्र डागले जात असल्याचे दृश्य यात आहे. हा व्हिडिओ अधिक स्पष्ट नाही, पाण्यानजीक मोठ्या प्रमाणात हालचाली होत असल्याचे यात दिसून येते. हेलिकॉप्टरवर हल्ला झाला आणि ते समुद्रात कोसळल्याचे समजते. रेडिओ कम्युनिकेशनला इंटरसेप्ट केल्यावर पायलटचे संभाषण समोर आले. यात पायलट हेलिकॉप्टरवर हल्ला झाल्याचे सांगताना ऐकू येतो. एक विस्फोट झाला आणि हेलिकॉप्टर त्याच्या तावडीत सापडले, हल्ला पाण्यातून झाला होता. यामुळे काही यंत्रणा निष्क्रीय झाल्याचे वैमानिक सांगत असल्याचे समोर आले आहे.
युक्रेनची गुप्तचर यंत्रणा जीयूआरने टेलिग्रामवर याची माहिती दिली. क्रीमियाच्या पश्चिम किनाऱ्यावर केप तारखानकुट नजीक एका संघर्षात क्षेपणास्त्रांनी युक्त मगुरा व्ही5 सागरी ड्रोनने रशियन एमआय-8 हेलिकॉप्टर नष्ट केल्याचे म्हटले गेले.
पहिल्यांदाच अशाप्रकारचा हल्ला
युक्रेनच्या नेव्हल ड्रोनने पहिल्यांदाच एअर टार्गेटला लक्ष्य केले आहे. युक्रेनच्या सैन्याने क्रीमिया बेटावरील रशियन युद्धनौकांवर हल्ला करण्यासाठी सागरी ड्रोनचा वापर केला होता. नौदलाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सेवस्तोपोलमध्ये रशियाच्या सागरी तळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे रशियाला काळ्या समुद्रातील जवळपास सर्व युद्धनौकांना अन्यत्र हलविणे भाग पडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.