सावध ऐका पुढल्या हाका : मेगा क्रायोमेटोरचा इशारा
कोकण किनारपट्टीवर सध्या एका अजब घटनेची चर्चा रंगली आहे. 10 एप्रिल रोजी मालवण तालुक्यातील देवली येथे एका घरावर भर उन्हात आकाशातून अचानक 5 किलो वजनाचा बर्फाचा गोळा कोसळला. सुरुवातीला ही नैसर्गिक गारपीट असावी असा अंदाज वर्तवला जात असतानाच, पर्यावरण अभ्यासकांनी यामागचे वेगळे कारण स्पष्ट केले आहे. हा प्रकार सामान्य नसून तो ‘मेगाक्रायोमेटोर’(शु ण्rब्दसूद) या दुर्मीळ शास्त्रीय घटनेचा भाग असल्याचे म्हटले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी कोकणातील लांजा तालुक्यात गारपीटीसह पाऊस झाला होता. सिंधुदुर्गातही त्यावेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हा गारपीटीचा प्रकार असावा असेच अनेकांना वाटले. परंतु त्यादिवशी परिसरात कोणतीही मोठी गारपीट किंवा ढगफुटीची शक्यता नव्हती. तज्ञांच्या मते, हा मेगा क्रायोमेटोरचा प्रकार असून ढग नसतानाही आकाशात बर्फाचे महाकाय गोळे तयार होण्याच्या या प्रक्रियेने आता शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. 10 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण तालुक्यातील देवली (खालची) परबवाडी येथे विजय मधुकर देऊलकर यांच्या घराच्या छप्पराची कौले फोडून 5 किलो वजनाचा बर्फाचा गोळा स्वयंपाकघरात कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. ढगाळ वातावरण किंवा पावसाचे कोणतेही चिन्ह नसताना भलीमोठी गार कोसळल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. हा अमेरिका-इराण यांच्यातील युद्धाचा तर परिणाम नाही ना किंवा प्रवासी विमानांमधील ‘ब्ल्यू आईस’ तर नाही ना अशाही चर्चा रंगल्या. मात्र या दोन्ही शक्यता शास्त्रोक्तरित्या योग्य नाहीत असे समोर आले. ब्ल्यू आईसला अतिशय घाणेरडा दर्प येतो. देवलीत कोसळलेला बर्फ हा अतिशय फ्रेश होता. मालवण येथील पर्यावरण अभ्यासक प्रा. हसन खान यांच्या मते, वादळी किंवा ढगाळ स्थिती नसताना निरभ्र आकाशातून पडणारा बर्फाचा एक मोठा तुकडा म्हणजे ‘मेगा क्रायोमेटोर’. पांढरा आणि अपारदर्शक रंग हे दर्शवतो की, हा मेगाक्रायोमेटोर (बर्फाचा गोळा) वातावरणातील शुद्ध बाष्पापासून तयार झाला आहे. जेव्हा पाणी अतिशय वेगाने गोठते, तेव्हा त्यातील हवा बाहेर पडू शकत नाही आणि बर्फाला पांढरा रंग प्राप्त होतो.
उन्हाळ्याच्या सुऊवातीला किंवा हवामान बदलत असताना जमिनीलगत प्रचंड उष्णता आणि उंचावर कमालीची थंडी अशी स्थिती निर्माण होते. तेव्हा अशा विसंगतीमुळे पाऊस न पडता केवळ बर्फाचा गोळा पडण्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी नोंदल्या गेल्या आहेत. खाली निर्माण झालेली आर्द्रता व तिला वर नेणारा ऊर्ध्वगामी प्रवाह, वरच्या स्तरातील प्रचंड थंडी तसेच जेट प्रवाहाने निर्माण केलेली अस्थिरता या सर्व घटकांच्या संयोगामुळेच मालवणातील देवली येथे पावसाचे ढग नसतानाही भर दुपारी 5 किलोचा बर्फाचा गोळा पडला. विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतर भारतात एक दुर्मीळ स्थिती निर्माण झाली आहे, असे प्रा. खान यांचे म्हणणे आहे.
मागच्या महिन्यामध्ये दुहेरी जेट स्ट्रीमची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचा प्रभाव वाढल्याचे सांगितले जात आहे. उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह आणि पूर्वीय जेट प्रवाह हे दोन्ही प्रवाह एकाचवेळी सक्रिय झाले आहेत आणि ही एक दुर्मीळ घटना आहे. उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह हा हिवाळ्यात तयार होतो. हा जेट स्ट्रीम भूमध्य समुद्राकडून कमी दाबाच्या पट्ट्यांना सोबत घेऊन येतो. त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये, हिमालयाच्या दक्षिणेला पर्जन्य किंवा हिमवृष्टी होते. यालाच ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ असे म्हणतात. ही दरवर्षी घडणारी प्रक्रिया आहे. पण पूर्वीय जेट प्रवाह हा मान्सून कालावधीत सक्रिय होतो आणि त्याच्यामुळे भारतात पर्जन्यवृष्टी होते. हे दोन्ही एकाचवेळी सक्रिय झाले ही मात्र तज्ञांच्या मते अतिशय दुर्मीळ घटना आहे.
उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह हे सहसा उत्तर भारतावर असतात. पण मागच्या काही दिवसांपासून ते भारताच्या दक्षिणेकडे सरकले आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत ते पोहोचले आहेत. देवलीतील घटना घडण्यापूर्वी मालवणात पडलेल्या तुरळक पावसानंतर तापमान वाढ होण्याच्या जागी घट दिसून आली. बर्फाचा गोळा पडण्यापूर्वी 3 दिवस मालवणमध्ये भर दुपारी थंड हवा, निळेशार आकाश आणि रात्री तापमान घट व दव पडणे असे वातावरण होते. हा अनुभव उपोष्ण कटिबंधीय पश्चिमेकडील जेट स्ट्रीम आपल्या भागात सक्रिय असण्याचा सर्वात मोठा पुरावा मानला गेला आहे. जेव्हा हा जेट स्ट्रीम सक्रिय असतो, तेव्हा तो उंचावरची अति-थंड हवा खालच्या थरात मिसळते. त्यामुळे सध्या भारतातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी किंवा स्थिर आहे. तर किमान तापमानात अचानक घट झाल्याचे जाणवते आहे. हे या स्ट्रीमने आणलेल्या थंड हवेचे लक्षण असल्याचे मानले जात आहे. जर हा स्ट्रीम असाच रेंगाळत राहिला तर मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मालवणच्या किनारपट्टीवर हवेतील आर्द्रता जास्त असते. उन्हाळ्यात जमिनीवर प्रचंड उष्णता असल्याने हवा हलकी होऊन वेगाने वर जाते. ही खालची आर्द्र हवा दुपारच्या वेळी वर जाते (हवेचा ऊर्ध्वगामी प्रवाह) आणि उंचावर असलेल्या या पश्चिमेकडील थंड जेट स्ट्रीमच्या संपर्कात येते, तेव्हा तिचे रुपांतर अचानक बर्फाच्या गोळ्यात होते. वरच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे हजारो लहान गारा किंवा बर्फाचे कण गतिशीलतेने एकमेकांना चिकटून एकच मोठा बर्फाचा गोळा तयार होतो. हे जेट स्ट्रीममधील वारे इतके शक्तिशाली असतात की, ते बर्फाच्या कणांना बराचवेळ उंचावर तरंगत ठेवतात. जोपर्यंत तो बर्फाचा गोळा 5 किलोसारखा जड होत नाही, तोपर्यंत हे जेट स्ट्रीमशी संबंधित वारे त्याला खाली पडू देत नाहीत. लहान-लहान गोळ्यांचे थरावर थर साचतात आणि जड महाकाय गारा म्हणजे मेगाक्रायोमेटोर तयार होतो.
सदर गोळ्याचे तज्ञांनी निरीक्षण केले असता त्यामध्ये अनेक गोळे एकत्र झाल्यामुळे स्तर निर्माण झालेले दिसून आले आहेत. बहुतांश वेळा असे गोळे हे 10-12 किलोमीटर उंचीवरून खाली पडतात, तेव्हा त्याचा वेग ताशी 150 ते 200 किमी असू शकतो. एवढ्या प्रचंड वेगाने गोळा कोसळल्यास त्यात जीव जाण्याचा धोका असतो. देवलीतील घटना हवामान बदलाचे द्योतक आहे यात शंकाच नाही.
महेंद्र पराडकर