हेमंत सोरेन विरोधात भाजपकडून हेब्रोम
वृत्तसंस्था / झारखंड
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी सूची प्रसिद्ध केली आहे. या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने गामलियेल हेब्रोम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यातील संघर्ष बरहाईत मतदारसंघात होणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत हेब्रोम यांनी ऑल झारखंड स्टुडंटस् युनियन या पक्षाकडून याच मतदारसंघातून सोरेन यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यांना अवघ्या 2,573 मतांसह चौथे स्थान मिळाले होते. यंदा ते भारतीय जनता पक्षाकडून आपले भाग्य अजमावत आहेत. या पक्षाने तुंडी मतदारसंघातून विकाश महातो यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.
भारतीय जनता पक्ष या राज्याच्या 81 मतदारसंघांपैकी 68 स्थानी निवडणूक संघर्षात आहे. ऊर्वरित 13 जागांपैकी 10 जागा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असणाऱ्या ऑल झारखंड स्टुडंटस् युनियन (एजेएसयु) या पक्षाला देण्यात आल्या आहेत. तर संयुक्त जनता दलाला 2 आणि लोकजनशक्ती (रामविलास) या पक्षाला 1 जागा सोडण्यात आली आहे.
13 आणि 20 ला मतदान
झारखंड राज्यात दोन टप्प्यांमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक होत आहे. मतदाराचा प्रथम टप्पा 13 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्पा 20 नोव्हेंबरला आहे. प्रथम टप्प्यात 43 मतदारसंघांमध्ये, तर दुसऱ्या टप्प्यात 38 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मतगणना महाराष्ट्रासमवेत 23 नोव्हेंबरला केली जाणार आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये
झारखंड प्रदेश काँग्रेस शाखेचे माजी अध्यक्ष मानस सिन्हा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सरमा यांच्या उपस्थितीत सोमवारी या पक्षात प्रवेश केला. हिमांत बिस्व सरमा यांना झारखंड विधानसभा निवडणूक प्रभारीपद देण्यात आले आहे. मानस सिन्हा यांच्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांनीही या पक्षात प्रवेश केला.