जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून बेळगाव-चोर्ला मार्गावर अवजड वाहतूक
बुधवारी जांबोटी नाका येथे पोलिसांनी अवजड वाहतूक अडविल्यानंतर प्रकार निदर्शनास
बेळगाव : बेळगाव-चोर्ला मार्गावर अवजड वाहतूक करू नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावूनदेखील या मार्गावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. मागील आठवडाभरापासून अवजड वाहतुकीला पुन्हा सुरुवात झाल्याने कोणाच्या कृपाशीर्वादाने ही वाहतूक पुन्हा सुरू झाली? अशी विचारणा परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाला न जुमानता वाहतूक खुलेआम सुरू असल्याने नागरिकही संतापले आहेत.
बेळगाव-चोर्ला महामार्गाची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी महामार्ग खचला असून वाहतूक करणेही अवघड होत आहे. त्यामुळे या मार्गावरून अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी चोर्ला मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा आदेश बजावला
होता. या आदेशानुसार मागील महिनाभरापासून अवजड वाहतूक पूर्णत: बंद असल्याने अपघातांसह रस्त्याची होणारी हानी कमी झाली. परंतु, मागील आठ दिवसांपासून रात्रीच्यावेळी अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे. बुधवारी सकाळी जांबोटी नाका येथे पोलिसांनी अवजड वाहतूक अडविल्यानंतर वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. गणेशोत्सव असल्याने चोर्ला महामार्गावरील वाहतूक वाढली असताना अवजड वाहतुकीला परवानगी दिलीच कोणी? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा या समस्येकडे लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.
अवजड वाहतूक बंद न झाल्यास मोठे आंदोलन करणार
बेळगाव-चोर्ला महामार्ग अनेक ठिकाणी खचला असल्याने अवजड वाहतूक बंद करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार अवजड वाहतूक बंद होती. परंतु, काही दिवसांपासून पुन्हा अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मोठे अपघात व रस्त्याची हानी होऊ नये, यासाठी अवजड वाहतूक बंद करणे गरजेचे आहे. अवजड वाहतूक बंद न झाल्यास मोठे आंदोलन केले जाणार आहे.
-किरण गावडे (सामाजिक कार्यकर्ते)