For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्प परिसरातील अवजड वाहतूक रोखली

10:46 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्प परिसरातील अवजड वाहतूक रोखली
Advertisement

बेळगाव : कॅम्प येथून अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीत घेण्यात आला होता. यानुसार रविवारपासून ग्लोब थिएटर कॉर्नर व वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकासमोर मिलिटरी जवान तैनात करण्यात आले आहेत. यामुळे अवजड वाहतूक उभा मारुतीमार्गे सेंट झेवियर्स हायस्कूलकडे वळविण्यात आली आहे. शहरातील गर्दी कमी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून रहदारी पोलिसांनी ग्लोब थिएटरमार्गे अवजड वाहतूक वळविली होती. लॉरी, उसाचे ट्रक, डंपर, ट्रॅक्टर यासह इतर अवजड वाहने ग्लोब थिएटरमार्गे इंडिपेंडंट रोड, गांधी स्मारक अशी वळविण्यात आली होती. परंतु, कॅम्प परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, रहिवासी वसाहत असल्यामुळे अनेक वेळा आक्षेप घेतला जात होता. मागील वर्षी झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी पालकांमधून केली जात होती. कॅन्टोन्मेंट रहिवासी वसाहतीतून अवजड वाहनांची वाहतूक हा कायद्याने गुन्हा असल्याने यावर निर्बंध लावण्याचे आदेश ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी बुधवारी आयोजित कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत दिले होते. मनाई असतानाही अवजड वाहनांची वाहतूक झाल्यास वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला होता. अवघ्या चारच दिवसात ग्लोब थिएटर कॉर्नर व उत्तर विभाग रहदारी पोलीस स्थानकाच्यासमोर लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. रविवारी सकाळपासून अवजड वाहतुकीवर निर्बंध लावूनही वाहने इतर मार्गाने सोडण्यात आली. अचानक मार्गामध्ये बदल केल्याने वाहनचालकांचीही तारांबळ उडाली. अपघात रोखण्यास आलेल्या उपाययोजनांमुळे कॅम्प परिसरातील रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.