काश्मीर, हिमाचलवर हिमाची चादर
अटल बोगदा बंद : काश्मीरमध्येही जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांची कोंडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर भारत सध्या हिमवृष्टी, गारपीट आणि पावसाने हतबल झाला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात वर्षातील सर्वात जास्त हिमवृष्टी झाली आहे. हिमाचल प्रदेशात शनिवारी रात्री बर्फाचे वादळ आले. रोहतांगच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर 24 तासांत 3 फुटांपेक्षा जास्त बर्फ साचला होता. याचदरम्यान अटल बोगद्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी सुरू आहे. गेल्या 24 तासांत पुलवामा, अनंतनाग, शोपियान आणि कुलगाममध्ये सुमारे 2 फूट बर्फवृष्टी झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावरून रविवारी 24 तासांनंतर विमानसेवा सुरू झाली. कमी दृश्यमानता असूनही 23 उड्डाणे रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, याचदरम्यान 4 उड्डाणे वळवण्यात आली आणि दोन रद्द करण्यात आली. यापूर्वी शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात एकूण 44 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. उत्तरेतील तापमानात बरीच घट झाली असून थंडीचे प्रमाण वाढले आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये थंडीने गेल्या 58 वर्षातील विक्रम मोडला आहे.
काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. तसेच बहुतांश ठिकाणी हिम गोळा झाल्यामुळे हवाई दलाने सकाळ ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच विमानसेवा सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. गेल्या 24 तासांत श्रीनगरमध्ये 8 इंच, गांदरबलमध्ये 7 इंच आणि सोनमर्गमध्ये 8 इंच जाडीचा बर्फाचा थर दिसून येत होता. पहलगाममध्ये 18 इंच बर्फ पडला आहे. श्रीनगर-जम्मू महामार्गही बंद आहे. विमान आणि रस्ते सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. मुसळधार बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह रस्ताही बंद आहे. 8.5 किलोमीटर लांबीच्या नवयुग बोगद्यात साचलेला बर्फ काढला जात आहे. येथे अडकलेल्या लोकांनी बोगद्यात क्रिकेट खेळून वेळ काढला. लोकांना गाडीतच रात्र काढावी लागली.
दुसरीकडे राजस्थान-मध्यप्रदेशसह अनेक राज्यांत पाऊस झाला. दिल्लीत शनिवारी सकाळपर्यंत एका दिवसात 41.2 मिमी पाऊस झाला. 101 वर्षांतील डिसेंबरमध्ये एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये डिसेंबरमध्ये 9 दिवस थंडीची लाट होती. त्यामुळे डिसेंबर हा गेल्या 58 वर्षांतील सर्वात थंड ठरला. मध्यप्रदेशातील जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस आणि गारपीट होत आहे.
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीनंतर भूस्खलन
हिमाचलमध्ये गेल्या 24 तासांपासून बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू आहे. अनेक भागात भूस्खलनही झाले. धरमशालासह इतर डोंगराळ भागात तापमान 0 ते 1 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये सतत बर्फवृष्टी आणि पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे. चीन सीमेला जोडणारा जोशीमठ राष्ट्रीय महामार्गही सुरैथोथापलीकडे बंद आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ यांना जोडणारा चमोली-कुंड राष्ट्रीय महामार्ग धोतीधर आणि मक्कू बेंड दरम्यान बंद करण्यात आला आहे. कर्णप्रयाग जिह्यातील 50 हून अधिक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.