हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी
889 रस्ते बंद : उत्तराखंडमध्ये रस्त्यांवर 4 फूटपर्यंत बर्फाचा थर
वृत्तसंस्था/चंदीगड, नवी दिल्ली
उत्तर भारतातील विविध राज्यांमधील पर्वतरांगांमध्ये प्रचंड बर्फवृष्टी आणि पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात बुधवारी झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीनंतर उंचावरील भागात किमान तापमान -6 अंश सेल्सिअस ते -1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते. लाहौल-स्पिती जिह्यातील कुकुमसेरी येथे सर्वात कमी तापमान -6.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. प्रचंड हिमवृष्टीमुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 885 रस्ते आणि 3,000 हून अधिक वीज ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. पाईपलाईनमध्ये पाणी गोठल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होऊन हजारो कुटुंबांना फटका बसला आहे.
हिमाचल प्रदेशप्रमाणेच नजिकच्या इतर राज्यांनाही हिमवर्षावाचा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीनंतर गुरुवारी उत्तराखंडमध्ये सूर्यप्रकाश पडला होता. तथापि, बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्रीमधील रस्ते 3 ते 4 फूट बर्फवृष्टीने झाकलेले दिसून आले. चमोलीमधील औली येथे बुधवारी सुमारे 2 फूटांपर्यंत बर्फवृष्टी झाली होती. अजूनही पुढील आठवड्यापर्यंत राज्यात हिमस्खलनाचा इशारा जारी करण्यात आला आहे. पर्वतांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागातही दिसून येत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर राज्यांमध्ये पुन्हा थंडी आणि धुके वाढले आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये गुरुवारी सकाळी पाऊस पडला.
यापूर्वी बुधवारी अयोध्या आणि लखनौसह नऊ शहरांमध्ये पाऊस पडला होता. बिहारमधील पाच जिह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात तापमानात घट झाल्याने थंडी आणखी वाढेल, असा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बुधवारी बिहारमधील भागलपूर हा 7.4 अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात थंड जिल्हा होता. दरम्यान, 31 जानेवारीपासून राजस्थान आणि मध्य प्रदेशात वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. पंजाबमध्ये अमृतसर येथील वातावरण सर्वात थंड होते. येथे किमान तापमान 3.7 अंश सेल्सिअस होते. हरियाणातील भिवानीमध्ये पारा 5.5 अंशांपर्यंत घसरला. गुरुवारी सकाळी चंदीगड शहर दाट धुक्याने व्यापलेले दिसत होते.