मुसळधार पावसाचे कोलकात्यात तांडव
10 बळी : रस्ते-घरे पाण्याखाली : रेल्वे-मेट्रो सेवा विस्कळीत
वृत्तसंस्था/ कोलकाता
सोमवार रात्री उशिरा ते मंगळवार सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील आसपासच्या भागात अक्षरश: तांडव माजवले आहे. पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये दिवसभरात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना पर्जन्यवृष्टीचा फटका बसला. कोलकातामध्ये गेल्या 24 तासांत अंदाजे 247.5 मिमी पाऊस पडल्यामुळे हाहाकार निर्माण झाला आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर जवळपास 3 फूटांपर्यंत पाणी साचले होते. या पाण्यामुळे रस्ते, रेल्वे आणि मेट्रो वाहतूक प्रभावित झाली होती. तसेच दुर्गापूजन केल्या मंडपांनाही पुराचा विळखा बसल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्रीपासूनच कोलकाता शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला होता. या पावसामुळे मध्यरात्रीपासूनच अनेक भागात रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागला. सकाळपासून वाहतूक कोलमडली होते. रस्त्यांवर पार्क केलेली वाहने अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेली होती. घरे आणि निवासी संकुलांमध्येही पाणी साचले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आपत्तीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘मी यापूर्वी कधीही असा पाऊस पाहिला नव्हता. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्याबद्दल मला वाईट वाटते. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. आम्ही सर्वजण दु:खी आहोत. मला दुर्गापूजन करणाऱ्या मंडळांबद्दलही खूप वाईट वाटते,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
कोलकाता विमानतळावर पूर आणि खराब हवामानामुळे 30 उ•ाणे रद्द करण्यात आली. तसेच 42 विमाने उशिराने मार्गस्थ झाली. पुरामुळे शहीद खुदीराम आणि मैदान मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली होती. हावडा आणि सियालदाह विभागातील रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे हजारदुआरी एक्स्प्रेस आणि सियालदाह जंगीपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. चितपूर यार्डमध्ये पाणी साचल्याने येथून बाहेर पडणाऱ्या रेल्वेंची वाहतूक थांबवण्यात आली होती.
दुर्गा पूजा मंडप पाण्याखाली
राज्यात अभूतपूर्व आपत्तीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे दुर्गा पूजा मंडप पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी मंडपांचे नुकसान झाले आहे. बंगाल सरकारने पावसामुळे राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत, कोलकातामध्ये मागील 24 तासांत सरासरीपेक्षा 2,663 टक्के जास्त पाऊस पडला आहे. हावडा येथे सरासरीपेक्षा 1,006 टक्के जास्त पाऊस झाला. उत्तर 24 परगणा येथे सरासरीपेक्षा 857 टक्के जास्त पाऊस बरसला.
कोलकाता आणि दक्षिण बंगालच्या इतर जिह्यांमध्ये रात्रीच्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे पश्चिम बंगाल सरकारने मंगळवारी सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांना वेळापत्रकाच्या दोन दिवस आधी दुर्गा पूजन सुट्टी जाहीर केली. सध्याच्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे