For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर आद्राने दिली बळीराजाला साथ

08:52 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेर आद्राने दिली बळीराजाला साथ
Advertisement

गुरुवारी सायंकाळपासून तालुक्यात मुसळधार पाऊस

Advertisement

वार्ताहर /किणये

यंदा मृग नक्षत्र काळात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आद्रा नक्षत्राला सुरुवात होऊनही आठवडा झाला तरीही अद्याप दमदार पाऊस नव्हता. यामुळे खरीप हंगामातील पिके घ्यायची कशी? याची चिंता बळीराजाला लागून राहिली होती. अखेर गुरुवारी सायंकाळपासून तालुक्यात दमदार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे आद्राने बळीराजाला साथ दिली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाअभावी रताळी वेल लागवड व इतर खरिपातील कामे खोळंबली होती. भात रोप लागवड करण्यासाठी शिवारामध्ये पाणी साचणे गरजेचे होते. मात्र पाऊस नसल्यामुळे शिवारात पाणी साचले नव्हते. त्यामुळे पाऊस कधी येणार याची चिंता शेतकऱ्यांना लागून होती. अखेर गुरुवारी सायंकाळपासून तालुक्यात दमदार पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. शिवारांमध्ये पाणी साचू लागले आहे. अजूनही शिवारात पाणी साचल्यानंतर बळीराजा रोप लागवडीसाठी मशागत करणार आहेत.

Advertisement

पेरणी करण्यात आलेले भात पीक बऱ्यापैकी उगवून आलेले आहे. या पिकामध्ये शेतकऱ्यांनी कोळपणी केली आहे. मात्र पावसाअभावी अद्यापही रोप लागवडीच्या कामांना सुऊवात करण्यात आलेली नाही. काही शेतकऱ्यांनी भुईमूगची पेरणी केली असून या पिकाची उगवण चांगली झाली आहे. तसेच बटाटा लागवडीची धांदल सुरू आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, इनाम बडस, बाकनूर, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, नावगे, बामणवाडी, बाळगमट्टी, संतिबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले आदी गावातील शेतकऱ्यांनी शिवारामध्ये रताळी लागवड करण्यासाठी रताळ्याचे बांध मोठ्या प्रमाणात तयार केलेले आहेत. पाऊस सुरू झाला असल्यामुळे रताळी वेळ लागवडीच्या कामांनाही जोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढला होता.

Advertisement
Tags :

.