मुसळधार पावसाने झोडपले
काणकोणात तब्बल साडेपाच इंच : आजपासून चार दिवस ऑरेंज अलर्ट
पणजी : मुसळधार पावसाने गुऊवारी संपूर्ण गोव्याला झोडपून काढले. हवामान खात्याने रेड अलर्ट जरी केला होता. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण गोव्याला जोरदार पावसाचा तडाखा बसला. आजपासून पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी केले असून यादरम्यान मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासात गोव्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र पणजीत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले परंतु गुऊवारी रात्री उशिरा पावसाने पणजीला झोडपले. रेड अलर्ट जारी केल्यानंतर गोव्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. आजपासून 17 जूनपर्यंत हवामान खात्याने गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून यादरम्यान मुसळधार पाऊस पडेल असे म्हटले आहे.
काणकोणात साडेपाच इंच
गेल्या 24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद काणकोणमध्ये झाली असून तिथे साडेपाच इंच पाऊस पडला, तर सांगेमध्ये तीन इंच पावसाची नोंद झाली. मुरगावमध्ये सव्वा दोन इंच, साखळीत सुमारे दोन इंच, केपेत सुमारे दोन इंच, धारबांदोडा येथे पावणे दोन इंच, दाभोळी येथे देखील पावणेदोन इंच पाऊस पडला. जुने गोवेत दीड इंच, फोंडा एक इंच, मडगाव व पणजी येथे प्रत्येकी पावणे दोन इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे अर्धा इंच पाऊस पडला. पेडणे व वाळपईमध्ये अत्यंत नगण्य असा पाऊस पडला. गेल्या 24 तासांत सरासरी पावणे दोन इंच पावसाची नोंद झाली. उत्तर गोव्यात पाऊण इंच तर दक्षिण गोव्यात सव्वा दोन इंच सरासरी पाऊस पडला. यामुळे यंदाच्या मोसमात आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद साडेपाच इंच झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत साडेपाच इंच पाऊस कमी पडला आहे. हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार जोरदार वादळी वाऱ्यासह गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग ताशी 55 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.