राजस्थान बनले ‘चेरापुंजी’
बहुतांश जिल्ह्यांमध्ये धुवाधार पर्जन्यवृष्टी : मोठ्या धरणांमध्ये 90 टक्क्यांवर पाणीसाठा
वृत्तसंस्था/जयपूर
मुसळधार पावसामुळे राजस्थानात 49 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. ‘चेरापुंजी’सदृश पर्जन्यवृष्टीमुळे राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर 16 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाचा परिणाम म्हणजे राज्यातील जवळपास सर्वच छोटी-मोठी धरणे ओसंडून वाहत आहेत. विशेष म्हणजे मान्सूनच्या प्रस्थानाची वेळ जवळ आली असली तरी मुसळधार पावसाचा मारा सुरूच आहे. राजस्थानमध्ये नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा सामान्य पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या हवामान खात्यालाही मान्सूनच्या या वेगामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस मान्सून राज्यातून निघून जातो. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुऊवातीपासून पावसाचा जोर हळूहळू कमी होऊ लागतो. मात्र यावेळी मान्सून वेगळ्याच मूडमध्ये आहे.
261 लहान-मोठ्या धरणांमध्ये 77 टक्के पाणीसाठा
राजस्थानमध्ये गेल्या 49 वर्षांतील मान्सूनचे सर्वात भयंकर स्वरूप पाहायला मिळत आहे. राज्यातील 27 जिह्यात असामान्य पाऊस झाला असून, 16 जिह्यात जास्त पाऊस झाला आहे. केवळ 7 जिल्हे असे आहेत की जिथे सामान्य पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील एकाही जिह्यात सामान्य किंवा दुष्काळासारखी परिस्थिती नाही. मुसळधार पावसामुळे राज्यातील 22 मोठ्या धरणांमध्ये 90 टक्के पाणी जमा झाले आहे. त्याचबरोबर 261 लहान-मोठ्या धरणांमध्ये 77 टक्के पाणी साचले आहे. 408 लहान धरणांमध्ये 67 टक्के गोळा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्यात भूजल पातळी वाढण्याची शक्मयता
जयपूर हवामान केंद्राचे संचालक राधेश्याम शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये आतापर्यंत सामान्य पाऊस 392.82 मिमी झाला आहे. मात्र यावेळी 638.08 टक्के पाऊस झाला आहे. राज्यात यावषी झालेल्या अतिवृष्टीचे अनेक प्रकारचे परिणाम येत्या काही दिवसात पाहायला मिळू शकतात. एकीकडे राज्यात भूजल पातळी वाढण्याची शक्मयता आहे, तर दुसरीकडे धरणांमध्ये अधिक पाणी आल्याने पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. याशिवाय वाळवंटी प्रदेशात वर्षानुवर्षे होणारा अतिवृष्टी हा तज्ञांसाठी संशोधनाचा विषय ठरू शकतो.