दमदार पावसाने दिल्लीत दाणादाण
11 जणांचा मृत्यू; उत्तराखंड-हरिद्वारमध्ये पुरात अनेक गाड्या गेल्या वाहून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये संततधार बरसणाऱ्या पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरातील बहुतांश भागात पाणी साचल्यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पूर आणि पडझडीच्या घटनांमध्ये आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला असून वित्तहानीही मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे.
काही राज्ये वगळता देशभरात मान्सून जवळजवळ पूर्णपणे सक्रिय झाला आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हरिद्वार येथे शनिवारी गंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे 8 गाड्या वाहून गेल्या. दुसरीकडे, शुक्रवार-28 जून रोजी दिल्लीत 24 तासांत 9 इंच पाऊस पडला. पावसाचे हे प्रमाण जून 1936 मध्ये एका दिवसात 9.27 इंच पावसानंतरचा दुसरा मोठा विक्रम आहे. या पावसामुळे जूनच नाही तर मार्चपासून जूनपर्यंतच्या 4 महिन्यांचा कोटा पूर्ण झाला आहे. दिल्लीतही दोन दिवस मुसळधार पावसाची शक्मयता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने जोरदार वारे वाहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. एकीकडे दिल्लीत पावसाचा जोर वाढला असतानाच हिमाचल प्रदेशातील शिमला, सोलन, कांगडा, चंबा, सिरमौर आणि मंडीमध्ये 29-30 जूनसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीत पावसामुळे आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 5 जणांना जीव गमवावा लागला. शुक्रवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ख•dयात पडून 3 कामगार मृत झाले. पावसामुळे ख•ा पाण्याने भरला होता. शनिवारी सकाळी तिन्ही मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शनिवारी दुपारी सिरासपूर अंडरपासमध्ये दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तसेच ओखला परिसरातील अंडरपासमध्ये दिग्विजय कुमार चौधरी (60) नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
27 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने शनिवारी 27 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, अऊणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे.
हवामान विभागाचा अंदाज चुकला
दिल्लीत गुऊवारी-शुक्रवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे रस्त्यांवर 4-5 फूट पाणी साचले होते. यानंतर आमचे हवामान मॉडेल दिल्लीच्या पावसाचा अंदाज लावण्यात अपयशी ठरले, असे आयएमडीने सांगितले. हवामान विभागाने 29 आणि 30 जून रोजी दिल्लीत खूप मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु शुक्रवारी (28 जून) सकाळी कोणालाही मुसळधार पावसाची अपेक्षा नव्हती. 28 जून रोजी फक्त हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटी वादळासह जोरदार वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.