अतिपावसाचा कांदा उत्पादकांना फटका
60 हेक्टरातील कांद्याचे नुकसान : उत्पादकांना चिंता
बेळगाव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 60 हेक्टरातील कांदा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्ट अखेरीस झालेला मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. बागायत खात्याने नुकसानग्रस्त पिकाचा सर्व्हे करून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठविला आहे. सततच्या पावसामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यातच अतिपावसामुळे पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पिकाच्या उत्पादनासाठी मशागत, बियाणे, ट्रॅक्टर भाडे आणि मजुरीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. मात्र अतिरिक्त पावसामुळे कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही पाण्यात गेल्याची खंत उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
कांदा पिकांवर पिवळसर रोगाचा प्रादुर्भाव
विशेषत: रामदुर्ग, सौंदत्ती, यरगट्टी, बैलहौंगल तालुक्यातील सुमारे 4500 हेक्टरात कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. अतिरिक्त पावसामुळे शेकडो एकरातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय कांदा पिकावर पिवळसर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बागायत खाते आणि कृषी खात्याने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
औषध फवारणी
रोगाला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत माहिती दिली जात आहे. रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्यात कांदा उत्पादकांना अधिक फटका बसला आहे.
- महांतेश मुरगोड (बागायत खाते, सहसंचालक)